Header Ads

Loknyay Marathi

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात शिक्षकेतर कर्मचारी प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात शिक्षकेतर कर्मचारी प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न


सांगली: येथील डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या वतीने शिक्षकेतर कर्मचा-यांसाठी पाच दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली. २५ फेब्रुवारी ते २ मार्च या कालावधीमध्ये पार पडलेल्या या कार्यशाळेत प्रशासन, कार्यालय व्यवस्थापन व नितीमूल्ये, संवाद- लेखन कौशल्ये, माहिती तंत्रज्ञान आदी विषयांवर कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. या कार्यशाळेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे यांनी केले. यावेळी 'प्रशासकीय कार्याचे महत्त्व' या विषयावर मार्गदर्शन करताना त्यांनी विद्यापीठ कर्मचाऱ्यांच्या संपाचा उल्लेख केला. या संपाला पाठिंबा म्हणून वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयामधील सर्व कर्मचारी देखील संपावर आहेत. आपल्या न्याय्य हक्कांसाठी कर्मचाऱ्यांना संपासारख्या मार्गाचा अवलंब करावा लागत आहे. भारती विद्यापीठामध्ये कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी डॉ. पतंगराव कदम यांनी अनेक उत्तम आणि कर्मचारी हिताचे निर्णय घेतले आहेत. शिवाय वैद्यकीय मदत, कौटुंबिक दुःखात सहभाग, आर्थिक मदत असे अनेक उपक्रम डॉ. पतंगराव कदम साहेबांनी राबवले. याची जाणीव सर्व कर्मचाऱ्यांनी ठेवणे गरजेचे आहे. कर्मचाऱ्यांनी आपण कशा पद्धतीने वागावे याचे भान ठेवून मिळालेल्या प्रत्येक संधीचे सोने केले पाहिजे. वेळेचे बंधन पाळून जबाबदारीने व प्रामाणिकपणे काम करायला हवे असे मतही त्यांनी व्यक्त केले.
      

या पाच दिवसीय कार्यशाळेत भारती विद्यापीठ मेडिकलच्या सौ.श्वेता कुलकर्णी यांनी सामान्य प्रशासन, प्रा. डॉ. शिवाजी बो-हाडे व प्रा. तानाजी सावंत यांनी कार्यालय व्यवस्थापन व नीतिमूल्ये, डॉ. कृष्णा भवारी व प्रा. रोहिणी वाघमारे यांनी 'कामाच्या ठिकाणी संवाद आणि लेखन कौशल्ये' तर प्रा. सौ. भारती भावीकट्टी व प्रा. अमोल वंडे यांनी 'प्रयोगशाळेतील सुरक्षितता व माहिती व तंत्रज्ञानामधील जागरूकता' या विषयावर कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यशाळेस महाविद्यालयातील सर्व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


या कार्यशाळेचे नियोजन प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे यांच्या मार्गदर्शनाखाली उपप्राचार्य प्रा. डॉ. शिवाजी बो-हाडे व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष समन्वयक डॉ. अमित सुपले, प्रा. तानाजी सावंत, प्रा. सतीश कांबळे, डॉ. अनिकेत जाधव, डॉ. कृष्णा भवारी, प्रा. यशवंत धुळगंड व प्रा. रोहिणी वाघमारे यांनी केले.

(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)