Header Ads

Loknyay Marathi

पुस्तक परिचय: नॉट विदाऊट माय डॉटर

पुस्तक परिचय: नॉट विदाऊट माय डॉटर

परिचय : प्रा. कु. सुलभा तांबडे

पुस्तक परिचय मालिकेतील आणखी एक पुस्तक की ज्या असंख्य वाचकांनी या पुस्तकाला पसंती दिली आहे, असे अत्यंत लोकप्रिय व उत्सुकता वाढवणारे पुस्तक म्हणजे,’नॉट विदाऊट माय डॉटर ‘ खरंतर हे आत्मकथननच बेट्टी महमूदी यांच्या वाट्याला आलेला हा संघर्ष त्यांनी विल्यम हाफर यांच्या सहाय्याने वाचकांच्या समोर आणला आहे. मूळ इंग्रजी भाषेतील हे आत्मकथन याचे मराठी अनुवाद केला आहे सौ लीना सोहोनी यांनी.

अमेरिकेसारख्या प्रगतशील देशांमध्ये लहानाची मोठी झालेली बेट्टी. पहिल्या नवऱ्यापासून घटस्फोट घेऊन आपल्या दोन मुलांना घेऊन राहात होत्या. घटस्फोटामुळे मानसिक तणाव व प्रचंड निराशा त्यांच्या वाट्याला आली होती. पुन्हा विवाहाच्या फंदात पडायचं नाही असा निश्चय होता पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. अचानक उद्भवणारे शारीरिक दुखणं आणि त्यातूनच तिची भेट डॉ. सय्यद बोझोर्ग महमूदी उर्फ मुडी झाली.यांची भेट प्रथम पेशंट- डॉक्टर, मित्र -मैत्रीण, प्रियकर-प्रेयसी अशा या फुलणाऱ्या नात्याचा शेवट विवाहामध्ये झाला. सात वर्ष सुखाचा संसार,मोहताब या गोंडस मुलीला जन्म सगळं कसं स्वप्नवत सुरू असतानाच, अचानक मूडी ने आपण इराणला म्हणजेच मुडीच्या मुळच्या देशात जाऊन कुटुंबियांना भेटून परत केव्हाही अमेरिकेत येऊ शकतो असे आश्वासन देऊन बेट्टीला व मोहताबला इराणला घेऊन गेला.

मूडी हा मुळचा ईरान देशातील लहानपणी आई वडील निवर्तलेले,बहिणीने लहानाचं मोठं केलं. शिक्षणासाठी अमेरिकेत आलेला मुडी प्रथम शिक्षण व नंतर नोकरी असं करत अमेरिकेतच रमला व बेट्टीवर उपचार करत करत बेट्टीच्या प्रेमात पडून तिच्याशी विवाहबद्ध झाला. कालांतराने होणारी राजकीय उलथापालथ त्यातून स्वदेशी लोक एकत्र येणं,बैठका,चर्चा,पत्रक काढणं हे सुरू झाले. अमेरिके विषयी द्वेष यातूनच पती-पत्नीमध्ये वाद – विवाद होऊ लागले. अधेमध्ये नातेवाईकांचे फोने येणं, नातेवाईक यांना भेटणं सुरूच राहिल्याने एक दिवस मुडीने बेट्टीला आपण इराणला जाऊन माझ्या नातेवाईकांना भेटून परत अमेरिकेत येऊ असं आश्वासन देऊन मुडी,बेट्टी व मोहताब यांना घेऊन मायदेशी परतला. हे सर्व जण इराणच्या विमानतळावर उतरले व तिथूनच बेट्टीच्या संघर्षाला सुरुवात झाली.

दोन देशाच्या संस्कृतीतील प्रचंड विभिन्नता, स्त्रियांचे पोशाख, स्त्रियांचा दर्जा, कायदे, अस्वच्छता अशा अनेक गोष्टींशी जुळवून घेणे बेट्टीला अशक्य झाले. परत जाण्याची तारीख जवळ येऊ लागली पण मुडी जाण्याचे नावच काढेना आणि एक दिवस मुडीने बेट्टीला खडसावले,’ आता तू इथेच राहायचं समजलं?तू आता इराण सोडून कधीच जायचं नाही, मरेपर्यंत इथंच राहायचं!’. बेट्टीला मनातून ज्याची भीती वाटत होती तेच घडले. ती प्रचंड चिडली, रडली पण कशाचाच परिणाम मूडीवर झाला नाही. बेट्टीला अठरा महिने जीवघेणा संघर्ष करावा लागला. अनेकदा नवऱ्याकडून प्रचंड मायलेकींना मारहाण करण्यात आली, अपमान तर सततच होत होता, त्या दोघी ना नजर कैदेत ठेवण्यात आले. काही दिवस मायलेकींची ताटातूट करण्यात आली. बेट्टीला आपल्या आई-वडिलांना चोरून फोन करावा लागत असे. सुटकेच्या प्रयत्नासाठी एमबसी मध्ये चोरून जात होती. अनेकांना सुटकेसाठी गयावया करत होती. इराणी रीतीरिवाजाप्रमाणे आपल्याला अमेरिकेला सुखरूप परत जायला मिळू दे म्हणून नवस बोलत होती. बेट्टी वडीलांच्या ‘ इच्छा तिथे मार्ग ‘या प्रेरणा देणाऱ्या वाक्यामुळे सतत प्रयत्न करत राहिली. अचानक या तिच्या प्रयत्नांना यश आलं. एका अनामिक व्यक्तीने तिला अमेरिकेमध्ये पोहोचविण्याचे आश्वासन दिले. पण त्यांनी जो मार्ग सांगितला तो अत्यंत बेभरवशाचा, खडतर असा होता. तरीही तिने मोहताबला सोबत घेऊन हे धाडसी पाऊल उचललं आणि सुदैवानं ती सुखरूप आपल्या मायदेशी परतली. बेट्टी म्हणते इराण मध्ये चांगले वाईट दोन्ही अनुभव आले. तिथल्याच लोकांनी तिला परतीच्या प्रवासातही मदत केली. असे हे अत्यंत रोमांचकारी जिद्दी बेट्टीचे आत्मकथन नक्की वाचावे असेच आहे.