Header Ads

Loknyay Marathi

डॉ. एस. आर. रंगनाथन : व्यक्तित्व व कार्य

डॉ. एस. आर. रंगनाथन : व्यक्तित्व व कार्य

     भारतातील अतिप्राचीन गुरुकुल पद्धती ही शिक्षणकेंद्रेच होती. इ.स. ४०० च्या सुमारास नालंदा विद्यापीठ स्थापन झाले. येथील ग्रंथसंग्रह विपुल प्रमाणात होता. इ.स.१८८७ मध्ये अमेरिकेत मेलविल ड्युई यांनी ग्रंथपालनाचा अभ्यासक्रम सुरु केला. पूर्वीपासून भारतात ग्रंथालये अस्तित्वात होती तरी ग्रंथपालनाचा अभ्यासक्रम बडोदे संस्थानातील सयाजीराव गायकवाड यांनी इ.स.१९११ साली सुरु केला. स्वतंत्र भारताच्या जडणघडणीमध्ये हातभार लावून त्याला आजचे विकसनशील राष्ट्र म्हणून जगात मनाचे स्थान प्राप्त करवून देण्यामध्ये ज्या काही महान विभूतींचे परिश्रम कारणीभूत आहेत त्यात डॉ. शियाळी रामामृत रंगनाथन यांचा फार मोठा वाटा आहे. “विद्येविना गति नाही” हा मूलमंत्र प्रथमत: महाराष्ट्रामध्ये महात्मा जोतिबा फुले यांनी जनतेमध्ये जाणीवपूर्वक व परिश्रमपूर्वक रुजविला. सुसंस्कृत समाजनिर्मितीसाठी शालेय शिक्षणासोबतच निरंतर शिक्षणाची सुद्धा अत्यंत आवश्यकता आहे आणि त्याकरिता  ग्रंथालयांचा सुधृड पायावर विकास, ग्रंथांचा प्रसार होवून सर्व सामान्य भारतीयाला ज्ञानाची दारे उघडी ठेवली पाहिजे, त्याला वाचन करण्याकरता प्रवृत्त केले पाहिजे हा विचार भारतामध्ये डॉ.रंगनाथन यांनीच सर्वप्रथम रुजविला, जोपासला, वाढविला आणि केवळ त्याकरिताच आपले आयुष्य झिजविले.

     मद्रास प्रांतात तंजावर जिल्ह्यात शियाळी या खेडेगावात १२ ऑगस्ट १८८२ साली डॉ.रंगनाथन यांचा जन्म झाला. त्यांचे शालेय शिक्षण शियाळी येथेच हिंदू हायस्कूल मध्ये इ.स.१८९८ ते १९०८ या काळात पार पडले. ज्ञानप्रेम ही रंगनाथन यांना लाभलेली उपजत नैसर्गिक देणगी असावी. लहानपणापासूनच त्यांनी संस्कृत वाङमयाचे उत्तम प्रकारे अध्ययन केले. महाविद्यालयीन शिक्षणाकरिता मद्रास येथील ख्रिश्चन कॉलेजमध्ये इंग्रजी विषयास प्रवेश घेवून बी.ए. ही पदवी प्रथम श्रेणीमध्ये प्राप्त केली. आपल्या ज्ञानाची, बुद्धिमत्तेची प्रभा त्यांनी आपल्या महाविद्यालयीन जीवनातही त्यांनी तितक्याच प्रभावीपणे समोर आणली. “ग्रंथ हे आपले गुरु होत” ही भावना मनात दृढ झाली. यांच्या भावी जीवनाचा पाया ग्रंथालायानेच घातला.

     विशेषतः सार्वजनिक ग्रंथालयाच्या क्षेत्रात समाजातील जाती, धर्म, पंथ, वर्ण अशा सर्व घटकांना सर्वजनिक ग्रंथालयात विनामूल्य सेवा मिळावी या दृष्टीने त्यांनी प्रयत्न केला. परदेशात जावून तेथील ग्रंथालयांचा अभ्यास करून यांनी ग्रंथालयशास्त्राची पाच सूत्रे तयार केली. संपूर्ण ग्रंथालयशास्त्राची उभारणी त्यांनी या पाच सुत्रांवारच केली आहे. या पाच सुत्रांना न्यायालयाचा मान आहे. तसेच ग्रंथालयाचे वर्गीकरण सुलभ व्हावे म्हणून द्विबिंदू वर्गीकरण पद्धती विकसित केली. यांच्या कार्याच्या स्मरणार्थ भारत सरकारच्या संस्कृती विभागाने ‘राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान’ (RRRLF) ची स्थापना कलकत्ता येथे १९७२ साली केली आहे. आज या प्रतिष्ठानने संपूर्ण देशभर सार्वजनिक ग्रंथालयाचे जाळे निर्माण केलेले आहे. आज भारतामध्ये डॉ.रंगनाथन यांचे नांव घेताच ग्रंथ, ग्रंथकार, ग्रंथालये, ग्रंथालय शास्त्र व ग्रंथालय चळवळीचे आद्य प्रणेते म्हणून त्यांची प्रतिमा साकारते. म्हणून डॉ. एस. आर. रंगनाथन यांचा जन्मदिवस ग्रंथपाल दिन म्हणून साजरा केला जातो.