Header Ads

Loknyay Marathi

पदवीच्या अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राची परीक्षा वगळता इतर सर्व परीक्षा रद्द : उदय सामंत

पदवीच्या अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राची परीक्षा वगळता इतर सर्व परीक्षा रद्द : उदय सामंत 

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. पदवीच्या अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राची परीक्षा वगळता इतर सर्व परीक्षा रद्द केल्याची घोषणा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी केली आहे.

विद्यापीठांच्या पदवीच्या अंतिम परीक्षा 1 ते 31 जुलै दरम्यान घेतल्या जातील. पण, लॉकडाऊनची स्थिती कायम राहिल्यास 20 जूननंतर बैठक घेऊन याबाबत अंतिम निर्णय येईल. इतर सर्व वर्षाच्या सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर एटीकेटी लागलेल्या विद्यार्थ्यांनाही पुढच्या वर्गात प्रवेश दिला जाईल. मात्र, प्रवेश दिल्यानंतर ज्या विषयाच्या एटीकेटी लागलेल्या आहेत, त्या विषयाच्या परीक्षा 120 दिवसांच्या आत घेतल्या जातील, असंही उदय सांमत यांनी माहिती दिली आहे.

पहिल्या आणि दुसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांचे सरासरी गुण काढून त्यांना पुढील वर्गात प्रवेश मिळणार आहे. यामध्ये पूर्वीच्या वर्षाचा परफॉर्मन्स 50 टक्के गृहीत धरला जाईल आणि सध्याचा परफॉर्मन्स 50 टक्के ग्राह्य धरला जाईल. परंतु, नापास झालेले विषय पुढील परीक्षेत उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. आधी कमी गुण मिळाले असतील तर ऐच्छिक परीक्षा देण्याचीही मुभा देण्यात आली आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) निर्देशांनुसार निर्णय घेण्यात आल्याचं उदय सामंत यांनी सांगितलं.

आणखी काय म्हणाले उदय सांमत?

- स्वायत्त विद्यापीठांनाही विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (युजीसी) निर्देशाप्रमाणे याच फॉरमॅटद्वारे परीक्षा घ्याव्या लगणार आहेत.

- चार वर्षाचा कोर्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना केवळ आठव्या सत्राची (सेमिस्टर) परीक्षा द्यावी लागणार आहे. तसेच पाच वर्षाचा कोर्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना केवळ 10 व्या सेमिस्टरची परीक्षा द्यावी लागेल.

- ज्या अभ्यासक्रमाच्या परीक्षा वार्षिक होतात, त्यांच्या केवळ अंतिम वर्षाच्या विद्यार्थांची परीक्षा घेण्यात येईल.

- दोन वर्षाच्या अभ्यासक्रमाच्या केवळ चौथ्या सत्राची (सेमिस्टर) परीक्षा होईल.

- गोंडवाना विद्यापीठ हे हिरव्या पट्ट्यामध्ये (ग्रीन झोन) येत असल्यामुळे तेथील अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याबाबत मुभा दिली आहे. या विद्यापीठांतर्गत गडचिरोली आणि चंद्रपूर हे जिल्हे येतात. येथील भोगोलिक परिस्थिती पाहून विद्यापीठ स्वतःच्या वेळापत्रकानुसार परीक्षा घेईल.

- एसएनडीटी विद्यापीठाच्या राज्यातील महाविद्यालयीन परीक्षा या वेळापत्रकानुसारच होतील इतर राज्यातील त्याच्या परीक्षेच्या वेळापत्रकानुसार होतील.

- उन्हाळी सुट्टीबाबत सर्व विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचा विचार करून संबंधित विद्यापीठ अंतिम निर्णय घेईल.

- नवीन शैक्षणिक वर्ष हे 1 सप्टेंबरपासून सुरू करण्यासाठी सर्व परीक्षांचे निकाल हे 15 ऑगस्टपर्यंत लावण्यात येतील.

- सामाईक प्रवेश परीक्षांच्या (सीईटी) बाबतीत येत्या 8 दिवसांत निर्णय जाहीर करण्यात येईल.

- पदविका, पदवी आणि पदव्युत्तरच्या अंतिम वर्षाच्या प्रॅक्टिकलच्या परीक्षा जर महाविद्यालयात घेता आल्या नाहीत तर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या जर्नल किंवा ऑनलाईन ओरल घेऊन गुणांकन केले जाईल.