Header Ads

Loknyay Marathi

परीक्षा न घेता श्रेणी देणार...

परीक्षा न घेता श्रेणी देणार...


'करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राजातील अंतिम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेणे अव्यवहार्य आहे. या विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याचा विचार करता या विद्यार्थ्यांची परीक्षा न घेता त्यांना विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) मार्गदर्शन तत्त्वांनुसार श्रेणी देण्याची परवानगी द्यावी; तसेच याबाबत मार्गदर्शन सूचना द्यावी,' अशी मागणी पत्राद्वारे यूजीसीच्या अध्यक्षांना केल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी दिली. यूजीसीचे उत्तर दोन दिवसांत मिळाले नाही, तर राज्य सरकार मार्गदर्शक तत्त्वांनुसार निर्णय जाहीर करणार असल्याचे सामंत यांनी फेसबुक लाइव्हद्वारे स्पष्ट केले.


करोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत विद्यापीठांच्या परीक्षा घेण्याबाबत यूजीसी आणि राज्य सरकारच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. त्यानुसार राज्यातील अकृषी विद्यापीठांच्या अभ्यासक्रमांच्या केवळ अंतिम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा जुलै महिन्यात होणार आहे. तर, अंतर्गत मूल्यमापन व यापूर्वीच्या परीक्षांच्या आधारे इतर वर्षाच्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात प्रवेश दिला जाणार आहे. राज्यातील सुमारे ८ ते १० लाख विद्यार्थ्यांची परीक्षा जुलै महिन्यात होणार आहे. मात्र, साधारण अडीच महिन्यांपासून विद्यार्थी गावाकडे आहेत. त्यांना अचानक वसततिगृहे सोडावे लागल्याने शैक्षणिक साहित्य तेथेच राहिले आहे. ग्रामीण भागात इंटरनेटची समस्या असल्याने विद्यार्थ्यांचा ऑनलाइन अभ्यास होऊ शकत नाही. त्यातच करोनाच्या भीतीमुळे अनेक विद्यार्थी परीक्षा द्यायला तयार नाहीत.


या परीक्षेसाठी विदर्भ, मराठवाडा, कोकण, खान्देशातून विद्यार्थ्यांना पुन्हा पुणे आणि मुंबई या रेड झोनमध्ये यावे लागेल, त्यांच्या आरोग्याची, जेवणाची व्यवस्था कशी करणार, असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केले होते. त्यामुळे इतर वर्षांच्या विद्यार्थ्यांप्रमाणे अंतिम वर्षाच्या विद्यार्थांनाही उत्तीर्ण करा, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून जोर धरू लागली आहे.


सामंत म्हणाले, 'राज्यात करोनाचा संसर्ग वेगाने होत आहे. त्यामुळे पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या परीक्षा जुलै महिन्यात घेणे कठीण आहे. अशा काळात सुरक्षित वावराचे नियम पाळून ८ ते ९ लाख विद्यार्थ्यांची घेणे अव्यवहार्य आहे; तसेच विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात टाकून परीक्षा घेणे सयुक्तिक ठरणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शारिरीक व मानसिक स्वास्थ्य याचा विचार करून अतिम वर्षाच्या परीक्षा न घेता यूजीसीच्या नियमानुसार ग्रेड प्रदान करण्यास मान्यता द्यावी आणि याबाबत मार्गदर्शक सूचना द्याव्यात अशी मागणी युजीसीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.'


'...तर, आम्ही निर्णय घेऊ'

'परीक्षा न घेता श्रेणी देण्याबाबतच्या पत्राचे उत्तर दोन दिवसांत न मिळाल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुख्य सचिव अजोय मेहता, उच्च व तंत्रशिक्षण खात्याचे सचिव सौरभ विजय, काही कुलगुरू यांच्यासोबत बैठकीत चर्चा करण्यात येईल. त्यानंतर राज्य सरकारचा विद्यार्थ्यांना श्रेणी देण्याबाबतचा निर्णय जाहीर करण्यात येईल,' असे सामंत यांनी सांगितले.


सीईटी तालुकास्तरावर होणार :

राज्यात व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी सीईटी परीक्षा घ्याव्या लागणार आहेत. सध्या या परीक्षा जुलै महिन्यात होतील. मात्र, परिस्थितीनुसार वेळापत्रक बदल होईल. यंदा परीक्षा जिल्ह्यासोबतच तालुकास्तरावर घेण्यात येतील. त्यानुसार विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने परीक्षा केंद्र निवडण्याची पुन्हा संधी दिली जाईल. परीक्षा केंद्रावर जाण्यास अडचण असल्यास, वाहतुकीची सुविधा सरकारकडून पुरविण्यात येईल. कोणी परीक्षा देण्यापासून वंचित राहिल्यास, त्यांना ऑगस्ट महिन्यात पुन्हा परीक्षा देण्याची संधी देण्यात येईल, असेही सामंत म्हणाले.