Header Ads

Loknyay Marathi

ज्ञानाधिष्टित समाज निर्माण करण्यासाठी शिक्षकांनी तंत्रज्ञानस्नेही बनावे : ना.डॉ. विश्वजीत कदम

ज्ञानाधिष्टित समाज निर्माण करण्यासाठी शिक्षकांनी तंत्रज्ञानस्नेही बनावे : मा.ना.डॉ. विश्वजीत कदम


आज जगामध्ये ज्ञान ही एक संपत्ती मानली जाते. ज्ञानातून संपत्ती गोळा करणे हा एक जागतिक पातळीवरचा मोठा उद्योग झाला असल्याकारणानं या मोठ्या उद्योगाचा आपण एक भाग बनावयाचे असेल तर सर्वानी  माहिती तंत्रज्ञानाची कास धरली पाहिजे. शैक्षणिक क्षेत्राबरोबर समाजातील प्रत्येक क्षेत्रातील निर्माण होणाऱ्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी ज्ञानाने व कौशल्याने समृध्द विद्यार्थी तयार झाले पाहिजेत. यातूनच  ज्ञानाधिष्टित समाज निर्माण होईल व आपले राष्ट्र हे महासत्ता बनू शकते.  म्हणूनच  ज्ञानाधिष्टित समाज निर्माण करण्यासाठी  शिक्षकांनी आज तंत्रज्ञानस्नेही होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन अन्न व नागरी पुरवठा, सहकार, कृषी, सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. विश्‍वजीत कदम यांनी केले.

येथील भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाच्या वतीने भारती विद्यापीठ ५६ व्या वर्धापनदिनानिमित्ताने शैक्षणिक क्षेत्रातील दीपस्तंभ -भारती विद्यापीठ या ई विशेषांकाचे आॅनलाईन प्रकाशन डॉ. विश्‍वजीत कदम यांच्या हस्ते करण्यात आले. आॅनलाईन संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी कुलगुरू डाॅ. माणिकराव साळुंखे, सहकार्यवाह डाॅ. के. डी. जाधव, कुलसचिव जी.जयकुमार, डाॅ. सुहास मोहिते आदी उपस्थित होते.

महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. डी. जी. कणसे यांच्या मार्गदर्शनाखाली संगणकशास्त्र विभागातील प्रा. अमोल वंडे यांनी सदरच्या ई-अंकाची निर्मिती ऑनलाईन माध्यमाचा वापर करून केली. डाॅ. शिवाजी बोर्‍हाडे व डाॅ. संतोष माने यांनी सदर अंकास निर्मिती सहाय्य केले. महाविद्यालयाच्या वतीने तयार केलेला भारती विद्यापीठ वर्धापनदिन ई विशेषांक हा प्रेरणदायी, अभिनंदनीय व कौतुकास्पद असल्याचे सांगत डॉ. विश्‍वजीत कदम म्हणाले, उच्च शिक्षण हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे.  यासाठी प्राध्यापक व महाविद्यालयांची गुणवत्ता व दर्जा सुधारावा लागेल. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जन्माला आलेली आजची तरुणाई वेगाने पुढे येऊ लागली आहे. त्यांची दृष्टी ही एकविसाव्या शतकातील तंत्रज्ञांच्या प्रगतीकडे झेपावलेली आहे. त्यामुळे बदलत्या शिक्षण प्रवाहात शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. तंत्रज्ञानाचे कौशल्यपूर्ण शिक्षण ही आधुनिक शिक्षणातील महत्त्वाची गरज असून या बदलाचे शिक्षकांनी साक्षीदार व्हावे. विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक विचारसरणी रुजवून भावी पिढीच्या ध्येय प्राप्तीसाठी नवतंत्रज्ञानाचा  अध्ययन अध्यापनात समावेश करावा, असे आवाहन ना.डॉ.विश्‍वजीत कदम यांनी यावेळी केले.

सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने सर्वजण लॉकडाऊन आहेत. या कालावधीत महाविद्यालयातर्फे राबविण्यात आलेल्या ऑनलाईन उपक्रमाची माहिती प्राचार्य डाॅ. डी. जी. कणसे यांनी मंत्री महोदयाना ऑनलाईन देऊन ई विशेषांकाचे ऑनलाईन प्रकाशनासाठी उपस्थित असणार्‍या सर्वाचे आभार मानले. त्याचबरोबर http://bit.ly/BV-Anniversary-2020 या  लिंक वर क्लिक करुन भारती विद्यापीठ  ई विशेषांकाचे  वाचन आजी माजी विद्यार्थ्यांनी, प्राध्यापकांनी व नागरिकांनी करावे असे आवाहन  प्राचार्य डाॅ.डी.जी.कणसे यांनी केले आहे.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)