Header Ads

Loknyay Marathi

जागतिक विकासासाठी डिजिटल आणि शाश्वत विकास गरजेचा : कुलगुरू डॉ. रजनीश कामत

जागतिक विकासासाठी डिजिटल आणि शाश्वत विकास गरजेचा : कुलगुरू डॉ. रजनीश कामत


डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात पाचवी विज्ञान राष्ट्रीय परिषद संपन्न


सांगली : जागतिक दृष्टिकोनातून डिजिटलायजेशनसोबत शाश्वत विकास झाला तरच ख-या अर्थाने जागतिक विकास घडून येईल असे प्रतिपादन मुंबईच्या डॉ. होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. रजनीश कामत यांनी केले.
            
येथील भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात "रिसेंट ट्रेंड्स इन प्युअर अँड अप्लाईड सायन्सेस"  या विषयावर आयोजित पाचव्या राष्ट्रीय विज्ञान परिषदेच्या बीजभाषणप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर डॉ. डी. वाय. पाटील कृषी व तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. प्रतापन, डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे, शिवाजी विद्यापीठाच्या रसायनशास्त्र अधिविभागाचे प्रमुख डॉ. के. डी. सोनवणे, डॉ. एस. एम. पवार, उपप्राचार्य प्रा. डॉ. शिवाजी बोऱ्हाडे व डॉ.अमित सुपले, वरिष्ठ प्राध्यापक टी. आर. सावंत, कनिष्ठ विभाग प्रमुख प्रा. ए. एल. जाधव, परिषदेचे समन्वयक डॉ. डी. पी. नाडे, कडेगावच्या कन्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. वाय. कदम आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते भारती विद्यापीठाचे संस्थापक कुलपती स्व. डॉ. पतंगराव कदम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
   
   
पुढे बोलताना डॉ. कामत म्हणाले की, भविष्यात वेगवेगळ्या मानवी गरजा वाढतच जातील. इ.स. 2050 पर्यन्त जगाच्या लोकसंख्येमध्ये 35% नी वाढ होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे मानवाच्या मूलभूत गरजांची पूर्तता करताना अनेक समस्या निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. या तंत्रज्ञानामुळे मानवी समस्या सोडविणे शक्य असले तरी त्याच्या अतिवापरामुळे होणाऱ्या गंभीर दुष्परिणावर त्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. मोबाईल व तंत्रज्ञानाच्या अतिवापरामुळे अनेक आजार उद्भवून आरोग्यविषयक व कौटुंबिक समस्या निर्माण होतील. या समस्या वेळीच ओळखून त्यावर उपाय शोधला पाहिजे असेही प्रतिपादन त्यांनी केले.


या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ. डी.  वाय. पाटील कृषी व तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. प्रतापन  यांनी कृषी क्षेत्रातील तंत्रज्ञानाचा विकास व मूलभूत विज्ञानातील अडथळे यावर सखोल मार्गदर्शन केले.  डॉक्टरेट व पोस्ट डॉक्टरेट अभ्यासक्रमांसाठी देश-परदेशातील मोठ्या संस्थानी परस्परांशी सहकार्य करार करावेत तरच कृषी क्षेत्रात प्रगती शक्य होईल असे सूचक विधान त्यांनी केले.
   
याप्रसंगी डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे म्हणाले की, विज्ञान व तंत्रज्ञानाचा सद्य:स्थितीमधील विकास हा गरजेचा आहे. विज्ञानाचा विकास हा मानवजातीला जसा हितकारक आहे तसाच तो अन्य सजीवसृष्टीच्या हिताचा होण्याकडे आपण सर्वांनी लक्ष दिले पाहिजे व त्या अनुषंगाने वाटचाल केली पाहिजे. चॅटजीपीटी, रोबोटिक्स आणि संगणकीय प्रतिकृती या विषयावर देखील त्यांनी यावेळी भाष्य केले.
        
द्वितीय सत्रातील प्रमुख वक्ते शिवाजी विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. के. डी. सोनवणे यांनी मल्टीड्रग्स रेजिस्टन्स स्ट्रेन्स या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. सत्राध्यक्षपदी
 
प्रा. डॉ. संजय पोरे होते. तर तृतीय सत्राचे प्रमुख वक्ते म्हणून संजय घोडावत विद्यापीठातील भौतिकशास्त्र विषयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. एस. एम. पवार यांनी नॅनो सायन्स आणि नॅनो मटेरियल या विषयावर आपले विचार व्यक्त केले.
    
चौथ्या सत्रामध्ये रिसेंट ट्रेन्स इन प्युअर अँड अँप्लाईड सायन्सेस या विषयावर विविध पोस्टर्सचे प्रेझेंटेशन घेण्यात आले, यामध्ये वेगवेगळ्या विषयावरील ५३ पोस्टर्सचे ऑनलाईन व ऑफलाईन प्रदर्शन पार पडले. या पोस्टर प्रदर्शनासाठी तज्ज्ञ म्हणून आयआयटीएम पुणेच्या शास्रज्ञ डॉ. राणी पवार व यशवंतराव चव्हाण कॉलेज सातारा येथील डॉ. संतोष कांबळे यांनी काम पाहिले. समारोपप्रसंगी मिरज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. आर. जाधव यांनी परिषदेबद्दल आपले विचार व्यक्त केले. यावेळी प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे यांच्या हस्ते पोस्टर प्रदर्शनातील प्रथम पाच क्रमांक संपादन केलेल्या सहभागी प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला. परिषदेचा सर्वंकष आढावा समन्वयक डॉ. दादा नाडे यांनी घेतला. त्यात त्यांनी परिषदेचा उद्देश व फलित यावर भाष्य केले. 

कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. अमित सुपले यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.भारती भावीकट्टी यांनी तर आभार प्रदर्शन परिषदेचे सचिव डॉ. मारुती धनवडे यांनी केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजन महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. शिवाजी बोऱ्हाडे व डॉ. अमित सुपले, प्रा. टी. आर. सावंत, डॉ. दादा नाडे, डॉ. मारुती धनवडे, डॉ. टी. आर. लोहार व अन्य प्राध्यापकांनी केले. या कार्यक्रम प्रसंगी विविध महाविद्यालयांतील प्राध्यापक, संशोधक, पदव्युत्तर विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. .

(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)