Header Ads

Loknyay Marathi

भारती विद्यापीठाचे दातृत्व विद्यार्थ्यांपर्यंत पाझरले: अजिंक्य पाटील

भारती विद्यापीठाचे दातृत्व विद्यार्थ्यांपर्यंत पाझरले: अजिंक्य पाटील
डॉ. विश्वजीत कदमांच्या वाढदिवसानिमित्त माजी विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक साहित्य वाटप
सांगली: पाय जमिनीवर ठेवून आकाश कवेत घेणाऱ्यांनाच मातीत पाय मळणाऱ्यांचे दुःख समजू शकते. त्यांनाच दीन-दुबळ्यांचे अश्रू पुसावेसे वाटतात. डॉ. पतंगराव कदम यांनी भारती विद्यापीठाच्या माध्यमातून सुरू केलेले हे कार्य त्यांची दुसरी पिढी डॉ. विश्वजीत कदम यांच्या रूपाने पुढे नेत आहे. त्यामुळेच माजी विद्यार्थ्यांनी गरीब, होतकरू व गरजू विद्यार्थ्यांसाठी सामाजिक जाणिवेतून शैक्षणिक साहित्य वितरणाचा हाती घेतलेला उपक्रम ही बाब भारती विद्यापीठाच्या नेतृत्वाचा दातृत्व गुण विद्यार्थ्यांपर्यंत पाझरल्याचा पुरावा आहे असे प्रतिपादन सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे नगरसेवक अजिंक्य पाटील यांनी केले.
येथील भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात भारती विद्यापीठाचे कार्यवाह व राज्यमंत्री ना. डॉ. विश्वजीत कदम यांच्या वाढदिवसानिमित्त माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे होते.

पुढे बोलताना पाटील म्हणाले की, आर्थिक परिस्थिती अभावी शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी भारती विद्यापीठाच्या माध्यमातून डॉ. विश्वजीत कदम यांनी आर्थिक व शैक्षणिक मदत करून डॉ. पतंगराव कदम साहेबांचा वारसा पुढे चालू ठेवला आहे. या दातृत्वातून उभे राहणारे नेतृत्व आपल्या कर्तृत्वाने  राज्यातच नव्हे तर देशातही यशाचे अवकाश कवेत घेऊ शकते असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे म्हणाले की, गरीब व हुशार मुलांसाठी शिक्षण हे एक वरदान आहे. याची जाणीव माजी विद्यार्थ्यांना व महाविद्यालयाला असल्यानेच शैक्षणिक साहित्य वाटप करून विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याचा हा एक प्रयत्न आहे. डॉ. विश्वजीत कदम यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महाविद्यालय दरवर्षी अशा प्रकारचे समाजोपयोगी उपक्रम राबवित असते.

यावेळी प्रा. तानाजी सावंत यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक व स्वागत डॉ. प्रभा पाटील यांनी केले तर आभार डॉ. रामचंद्र देशमुख यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा. सौ. वासंती गावडे यांनी केले. या प्रसंगी  प्रा. अरुण जाधव, प्रा. (डॉ.) शिवाजी बोऱ्हाडे यांच्यासह सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक व विद्यार्थी कोरोना निर्देशांचे पालन करून उपस्थित होते.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)