Header Ads

Loknyay Marathi

प्रत्येक माणसाला समाजभान आणि अर्थभान असलेच पाहिजे - कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे

प्रत्येक माणसाला समाजभान आणि अर्थभान असलेच पाहिजे - कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे
     जागतिकीकरणामुळे समाजात फार मोठी आर्थिक दरी  वाढत चालली आहे. त्यासाठी समाजात जनजागृती निर्माण करण्याची गरज आहे. एवढेच नव्हे प्रत्येक माणसाला समाजभानाबरोबरच अर्थभानअसले पाहिजे त्याशिवाय खऱ्या अर्थाने शाश्वत विकास होणार नाही. प्रा. संजय ठिगळे यांनी अर्थभान पुस्तकाच्या माध्यमातून सुलभीकरण व जनजागृतीचे कार्य केले आहे असे मत भारती अभिमत विश्वविद्यालयाचे कुलगुरू प्रा. माणिकराव साळुंखे यांनी  व्यक्त केले. 
     भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय सांगली, शिवाजी युनिव्हर्सिटी इकॉनॉमिक्स असोसिएशन कोल्हापूर व भाग्यश्री प्रकाशन कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने प्रा. संजय ठिगळे लिखित अर्थभान पुस्तकाचा प्रकाशन समारंभ कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांच्या हस्ते संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. जे. एफ. पाटील होते. यावेळी भारती विद्यापीठाचे मानद संचालक डॉ. एच. एम. कदम, जेष्ठ समीक्षक प्रा. वैजनाथ महाजन इ. मान्यवर उपस्थित होते. 
     याप्रसंगी प्रा संजय ठिगळे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ' साहित्य विश्व '  या वेब पोर्टलचे अनावरण कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांच्या हस्ते झाले.
     प्रारंभी उपस्थितांचे स्वागत प्राचार्य डी. जी. कणसे यांनी केले. प्रास्ताविक प्रा.तानाजी सावंत यांनी केले. 
     मार्गदर्शनपर भाषणात डॉ. माणिकराव साळुंखे म्हणाले की, शाश्वत विकासाचे अर्थशास्त्र देशाला समृध्द करणारे आहे त्यासाठी शाश्वत विकासाचा चालना देणारे अभ्यासपूर्ण लिखाण केले पाहिजे.
     अध्यक्षपदावरून बोलताना ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. जे. एफ. पाटील म्हणाले की, अलीकडे कुटुंबाचं अर्थशास्त्र बिघडत चालले आहे. एवढेच नव्हे तर एकत्र कुटुंब पद्धती हळू हळू कमी होऊ लागली आहे हे समाजाच्या दृष्टीने घातक आहे. आर्थिक विषयावर लेखन करणाऱ्या माणसाला आर्थिक व सामाजिक भान असावेच लागते त्याशिवाय लेखन परिपूर्ण होत नाही.
     प्रा. वैजनाथ महाजन म्हणाले की, अर्थशास्त्र अधिक सोपे करण्याचा नादात त्यातील आत्मा हरपून जाण्याची शक्यता असते.
     सूत्रसंचालन प्रा. भारती भावीकट्टी यांनी केले. आभार डॉ. अनिल वावरे यांनी मानले. याप्रसंगी दादासाहेब ठिगळे यांना ७७ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल व सौ. सुशीला ठिगळे यांना ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल डॉ. माणिकराव साळुंखे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. भाग्यश्री प्रकाशनच्या भाग्यश्री कासोटे-पाटील यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास सौ. मालन मोहिते, प्रा. राम पवार, डॉ अर्जुन महाडिक, महेश कराडकर, प्रा. आर. व्ही. पाटील, प्रा. सुभाष दगडे इ. मान्यवर उपस्थित होते.