डॉ.पतंगराव कदम महाविद्यालयात जागतिक इंग्रजी भाषा दिन व विल्यम शेक्सपियर जयंती दिन साजरा
डॉ.पतंगराव कदम महाविद्यालयात 'जागतिक इंग्रजी भाषा दिन' व 'विल्यम शेक्सपियर जयंती दिन' साजरा
सांगली: डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात इंग्रजी विभागाच्यावतीने 'जागतिक इंग्रजी भाषा दिन', जगविख्यात नाटककार 'विल्यम् शेक्सपियर यांची ४६१ वी जयंती' साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. एस. व्ही. पोरे उपस्थित होते. तसेच कनिष्ठ विभागप्रमुख प्रा. ए. एल. जाधव, प्रा. आर. एस. काटकर, इंग्रजी विभागप्रमुख प्रा.रोहिणी वाघमारे, डॉ. नरेश पवार, प्रा.ओंकार चव्हाण, प्रा. जयश्री हाटकर , डॉ.दादा नाडे, डॉ. अमर तुपे आदि उपस्थित होते.
या कार्यक्रमाप्रसंगी इंग्रजी विभागप्रमुख व कार्यक्रम समन्वयक प्रा. रोहिणी वाघमारे मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की, संयुक्त राष्ट्रांनी २०१० मध्ये इंग्रजी दिन सुरू केला, महान नाटककार आणि कवी विल्यम शेक्सपियर यांचा जन्म आणि मृत्यू २३ एप्रिल रोजी झाला, म्हणून संयुक्त राष्ट्रांनी हा दिवस इंग्रजी दिन म्हणून निवडला. विल्यम शेक्सपियरच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी हा दिवस निवडण्यात आला आहे.
यानंतर प्रा.आर. एस. काटकर आपले मत व्यक्त करताना म्हणाले की, विल्यम शेक्सपियर यांना 'बार्ड ऑफ एव्हॉन' म्हणून ओळखले जाते,ते इंग्रजी साहित्यातील महान नाटककार होते, त्यांनी केवळ नाटके लिहिली नाहीत तर १७०० हून अधिक इंग्रजी शब्दांची निर्मिती केली व त्यांनी लिहिलेले ३७ नाटके,१५४ सॉनेटस आणि कविता आजही जगभरात वाचल्या जातात. जागतिक इंग्रजी दिन हा केवळ शेक्सपियरच्या कलाकृतींना श्रद्धांजली नाहीतर त्या भाषेचा उत्सवही आहे.
यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. एस. व्ही. पोरे म्हणाले की, दरवर्षी २३ एप्रिल रोजी जगभरात 'जागतिक इंग्रजी भाषा दिन' साजरा केला जातो. हा दिवस केवळ एक भाषेचा नाही तर ही भाषा जगभर पसरलेल्या संस्कृतीचा व संवादाचा उत्सव आहे. विल्यम शेक्सपियरचे साहित्य अजूनही संपूर्ण जगभर अभ्यासले जाते आणि त्यांच्या नाटकांमधून मानवी भावना, समाज आणि राजकारण याचे प्रभावी चित्रण केले गेले आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन इंग्रजी विभागामार्फत करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्देश विद्यार्थ्यांना विल्यम शेक्सपियर यांच्या साहित्याची अधिक माहिती करून देणे व त्यांच्या साहित्याची आणि कलाकृती बद्दलची आवड वाढवणे हा होता. यावेळी इंग्रजी विभागातर्फे शेक्सपियरच्या साहित्यावर 'नॅशनल क्विझ' घेण्यात आली.
या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. रोहिणी वाघमारे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा. ओंकार चव्हाण यांनी केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)
Post a Comment