डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात अग्रणी महाविद्यालयांतर्गत कार्यशाळा संपन्न
डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात अग्रणी महाविद्यालयांतर्गत कार्यशाळा संपन्न
सांगली: शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर व भारती विद्यापीठाचे डॉ.पतंगराव कदम महाविद्यालय, सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने अग्रणी महाविद्यालयांतर्गत 'संशोधन पद्धती' या विषयावर कार्यशाळा संपन्न झाली. या प्रसंगी प्रमुख पाहुणे व विषय तज्ज्ञ प्रा.डॉ.संदीप पाटील व डॉ.अभिजित मुळीक यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य प्रा.डॉ.एस.व्ही.पोरे होते.
सदर कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात प्रा. डॉ.संदीप पाटील म्हणाले की, आपण संशोधन करत असताना ते संशोधन समाजोपयोगी आहे किंवा नाही याचा विचार केला पाहिजे. याचेच एक उदाहरण देत त्यांनी सांगितले की, त्यांच्या एका सहकाऱ्याने मधुमेह या आजारावर एक औषध निर्माण करून त्याचे परीक्षण केले आणि ते समाजात पोहचवले. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी संशोधनावर भर दिला पाहिजे असे ते म्हणाले.
कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात डॉ.अभिजित मुळीक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करता सांगितले की, संशोधन करत असताना संयम आणि चिकाटी बाळगली पाहिजे. तसेच थॉमस एडिसन यांचे उदाहरण देत ते म्हणाले की, त्यांनी विविध प्रयोग केले आणि त्यातले बरेच प्रयोग हे अयशस्वी झाले पण त्यांनी सातत्याने प्रयोग केल्यामुळे ते यशस्वी झाले.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना डॉ.एस.व्ही.पोरे म्हणाले की, अग्रणी महाविद्यालय ही योजना विद्यार्थ्यांसाठी शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनी त्यांच्या कार्यकाळात सुरु केली होती. संशोधन ही पद्धतशीर व वैज्ञानिक प्रक्रिया असून नव्या ज्ञानप्राप्तीचा हा व्यवस्थित असा मार्ग आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अशा प्रकारच्या कार्यशाळेस आवर्जून उपस्थित राहावे. तसेच कार्यशाळेस उपस्थित असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.अमित सुपले, प्रमुख अग्रणी महाविद्यालय समन्वयक डॉ.आर.एन. देशमुख, अग्रणी महाविद्यालय समितीचे समन्वयक प्रा. सतीश कांबळे, कार्यशाळा समन्वयक प्रा. नंदकुमार नाटके, भौतिकशास्त्र विभागप्रमुख डॉ. डी. पी. नाडे आदि मान्यवर उपस्थित होते.
या कार्यशाळेचे स्वागत व प्रास्ताविक डॉ.आर.एन.देशमुख यांनी केले. तर प्रा. यशवंत धुळगंड यांनी पाहुण्याचा परिचय करून दिला. आभार प्रदर्शन प्रा. नंदकुमार नाटके यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा. मंगेश गावित यांनी केले. या कार्यशाळेस अग्रणी महाविद्यालयांतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालयाचे प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)
Post a Comment