Header Ads

Loknyay Marathi

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी


सांगली :  भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून जयंती साजरी करण्यात आली.  या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे विद्यार्थ्यांना संदेश देताना म्हणाले की, महाराष्ट्राने देशाला अनेक थोर समाजसुधारक दिले, त्यापैकी समतेची शिकवण देणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज होते. शाहू महाराजांनी महाराष्ट्राला अनेक नव्या परंपरा घालून दिल्या. बहुजन समाजाच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न पाहणारे शाहू महाराज हे सत्यशोधक चळवळीचे पाईक होते. सामान्य माणसाला न्याय, हक्क मिळवून देणारा लोकराजा छत्रपती शाहू महाराज होते. त्यांनी सक्तीचे व मोफत प्राथमिक शिक्षण योजना अमलात आणली. त्याचबरोबर गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजना सुरू केली. समाजातील सर्व जाती, धर्माच्या मुलांना शिक्षण मिळावे म्हणून त्यांनी स्वतंत्र वसतिगृहे सुरू केली. अशा या थोर राजाची शिकवण आजही समाजाला प्रेरणा देणारी आहे आणि पुढेही प्रेरणादायी ठरेल.
      यावेळी  महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अमित सुपले, प्रा. अरूण जाधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. नितीन गायकवाड यांनी केले. याप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक उपस्थित होते.

(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)