Header Ads

Loknyay Marathi

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात पालक - शिक्षक मेळावा संपन्न

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात पालक - शिक्षक मेळावा संपन्न
सांगली : भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात अंतर्गत गुणवत्ता हमी विभागाच्या वतीने पालक - शिक्षक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कोरोनाच्या जागतिक महामारी मुळे दोन वर्षे पालक शिक्षक सुसंवाद घडला नव्हता. या वर्षी प्रथमच पालक शिक्षकांमध्ये अनेक विषयांवर चर्चा घडून आली. या मेळाव्यात सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेचे विद्यमान नगरसेवक मा. हरिदास पाटील व माजी नगरसेवक मा. व्ही. आर. पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना हरिदास पाटील म्हणाले की,
'डॉ. पतंगराव कदम साहेबांमुळे या भागात सर्व भौतिक सुविधांयुक्त असलेले हे महाविद्यालय येथे सुरू झाले. आजपर्यंत या महाविद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रांत नावलौकिक मिळविला आहे. आपल्या पाल्याची आवड आणि क्षमता लक्षात घेऊनच त्याला कोणत्या शाखेत प्रवेश घेतला पाहिजे ही पालक म्हणून आपली जबाबदारी आहे.'
प्रत्येक पालकाने किमान महिन्यातून एकदा तरी आपल्या पाल्यासंबंधी चौकशी करण्यासाठी महाविद्यालयात गेले पाहिजे असे त्यांनी यावेळी उपस्थित पालकांना आवाहन केले. यावेळी व्ही. आर. पाटील आणि महाविद्यालयाचे कला व वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. टी.आर. सावंत यांनी मनोगत व्यक्त केले.
 
 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे उपस्थित होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात ते म्हणाले की, डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय हे एक उपक्रमशील महाविद्यालय आहे. येथील सर्व प्राध्यापक हे अनुभवी आणि तज्ज्ञ आहेत. आपल्या पाल्याचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी महाविद्यालय सातत्याने प्रयत्नशील असते. त्यासाठी विद्यार्थ्यांबरोबरच पालकांचेही सहकार्य वेळोवेळी आम्हाला मिळणे आवश्यक आहे. या वेळी कणसे यांनी महाविद्यालयातील परीक्षांचे स्वरूप, उपस्थिती, शिस्त, शिष्यवृत्ती योजना, महाविद्यालयातील उपक्रम यांविषयी सविस्तर माहिती सांगितली.
      
या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक विज्ञान विभाग प्रमुख प्रा. डाॅ. सौ. प्रभा पाटील यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. वर्षा कुंभार यांनी केले तर आभार डॉ. नितीन गायकवाड यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी व त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)