Header Ads

Loknyay Marathi

व्यक्तिमत्व विकासासाठी शारीरिक शिक्षण महत्त्वाचे : डॉ. श्रीदेवी पवार

व्यक्तिमत्व विकासासाठी शारीरिक शिक्षण महत्त्वाचे : डॉ. श्रीदेवी पवार
      सांगली :  आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाने शारीरिक, मानसिक, भावनिक दृष्ट्या तंदुरुस्त असणे गरजेचे आहे.  त्यासाठी आहाराबरोबर व्यायामालाही तेवढेच महत्त्व आहे. व्यक्तिमत्त्व विकासासाठी शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी  शारीरिक शिक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन प्रा. डॉ. श्रीदेवी पवार यांनी केले. येथील भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात शारीरिक शिक्षण दिनानिमित्त आयोजित केलेल्या ऑनलाईन व्याख्यानात त्या बोलत होत्या.  पुढे बोलताना पवार म्हणाल्या की, प्रत्येक व्यक्तीला आयुष्याचा  समतोल साधता आला पाहिजे.  फिजिकल फिटनेस, न्युरो मस्कूलर डेव्हलपमेंट, नेतृत्वगुण ह्या गोष्टी सुद्धा व्यक्तिमत्त्व विकासासाठी तितक्याच महत्त्वाच्या आहेत. एकवेळ शाळेला भिंती नसल्या तरी चालतील पण शाळेला मैदान असणे खूप महत्त्वाचे आहे. कारण विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास हा खऱ्या अर्थाने मैदानावर होत असतो.
      अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाचे  प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे म्हणाले की,  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शारीरिक व मानसिक दृष्ट्या तंदुरुस्त असणे खूप महत्त्वाचे आहे. त्यासाठी आहार, व्यायाम व निद्रा यांचा समतोल राखता आला पाहिजे.  विद्यार्थ्यांनी तरुण अवस्थेत असताना शारीरिक कमाई केली तर ती  आयुष्यभर उपयोगी पडेल असा संदेश त्यांनी यावेळी दिला.

       या कार्यक्रमाला विज्ञान विभाग प्रमुख प्रा. डॉ. पी. एम. पाटील,  कला व वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. टी. आर. सावंत, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक  शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख प्रा. कु. आर. एस. कांबळे यानी  केले. आभार प्रा. ए. ए. तुपे यांनी  मानले तर प्रा. डॉ. एन. व्हीं. गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले.