Header Ads

Loknyay Marathi

सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा वसा जपला पाहिजे : डाॅ.डी.जी.कणसे

सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा वसा जपला पाहिजे : डाॅ.डी.जी.कणसे


सांगली : 'शिक्षणाशिवाय गोरगरिबांचा उद्धार होणार नाही, सर्व सुधारणांचे मूळ ज्ञानात आहे हे सावित्रीबाईंनी १९ व्या शतकात ओळखले होते.  प्रस्थापित समाजव्यवस्थेचा रोष पत्करून  पुण्यातील भिडे वाड्यात सावित्रीबाईंनी मुलींची पहिली शाळा सुरू करून स्त्रीशिक्षणाच्या बाबतीत क्रांती घडवून आणली. त्यांच्या या महान कार्याची ज्ञानज्योत अखंड तेवत ठेऊन समाजसेवेचा वसा जपला पाहिजे.' असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.डी.जी.कणसे यांनी केले. 

येथील डॉ.पतंगराव कदम महाविद्यालयात सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, पूर्वीच्या काळी स्त्रियांना चूल आणि मूल सांभाळावे लागत असे. सावित्रीबाईंनी काळाची पावले ओळखून जोतिराव फुलेंच्या बरोबर स्त्री शिक्षणाचा आग्रह धरला आणि स्वतः सावित्रीबाई शिक्षिका होऊन मुलींना शिकवू लागल्या.  समाज परिवर्तनाच्या दृष्टीने त्यांची भूमिका मोलाची होती.  आजची स्त्री ही सबला आहे. ती कर्तृत्ववान असून सक्षमपणे स्वतःच्या पायावर उभी आहे. स्त्री शिक्षणात झालेला हा आमूलाग्र बदल क्रांतिज्योती सावित्रीबाईंनी घडवून आणला.  

या वेळी महाविद्यालयाच्या विज्ञान विभागप्रमुख डॉ. सौ. प्रभा पाटील, कला व वाणिज्य विभागप्रमुख प्रा. टी. आर. सावंत उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभागप्रमुख  डॉ. नितीन गायकवाड, डॉ. कृष्णा भवारी, प्रा. जयश्री हटकर, प्रा. नरेश पवार, डॉ. वर्षा कुंभार, प्रा. सतीश कांबळे, प्रा. नंदकुमार नाटके यांनी केले. या प्रसंगी महाविद्यालयातील  प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक व विद्यार्थी उपस्थित होते.

(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)