Header Ads

Loknyay Marathi

पर्यटन व्यवसाय हा स्वयंरोजगाराचा मोठा स्त्रोत- डॉ. मीना पोतदार

पर्यटन व्यवसाय हा स्वयंरोजगाराचा मोठा स्त्रोत- डॉ. मीना पोतदार
सांगली : पर्यटन व्यवसाय हा स्वयंरोजगाराचा मोठा स्त्रोत आहे. केवळ जागतिक, राष्ट्रीय पातळीवरचा विचार न करता स्थानिक पातळीवरसुद्धा आपण पर्यटन व्यवसाय कसा विकसित करू शकतो याचा कल्पक विचार विद्यार्थ्यांनी केला पाहिजे. जे विद्यार्थी ग्रामीण भागात राहतात, ज्यांना शेती आहे ते स्वतः आपल्या शेतात कृषी पर्यटन विकसित करू शकतात. यामुळे शेतीही विकसित करता येते आणि अर्थार्जनाचा दुसरा स्त्रोत पण उपलब्ध होतो असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाच्या डिप्लोमा इन ट्रॅव्हल अँड टुरिझम विभागाच्या समन्वयक डॉ. मीना पोतदार यांनी केले.

येथील भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात 'पर्यटनातील नवीन संधी व आव्हाने' या विषयावर राज्यस्तरीय ऑनलाईन वेबिनारमध्ये प्रमूख वक्त्या म्हणून त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे होते. 
                      
पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, पर्यटनामुळे वेगवेगळ्या भागातील लोक एकत्रित येतात ज्यामुळे आचार- विचार, सांस्कृतिक मूल्य, भाषा, पोशाख, कला यांची देवाणघेवाण होऊन राष्ट्रीय एकता व आंतरराष्ट्रीय सामंजस्य वाढण्यास मदत होते.
              
विज्ञान विभाग प्रमुख डॉ. सौ. प्रभा पाटील म्हणाल्या की, करोना महामारीमुळे आज जरी पर्यटन क्षेत्र प्रभावित झाले असले तरी लोकांना मुळातच फिरण्याची आवड असल्यामुळे आणि विरुंगळा हवा असल्यामुळे जसजसे लॉकडाऊन शिथिल होत जाईल तसतसे या क्षेत्रातील रोजगाराच्या संधीही वाढत जातील. त्यामुळे विद्यार्थ्यांनी ट्रॅव्हल अँड टुरिझमचे कोर्सेस करुन या संधीचा फायदा घेतला पाहिजे.
              
प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे म्हणाले की, शाश्वत पर्यटन ही काळाची गरज आहे. पर्यटनामुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळत असली तरी पर्यावरणाचे रक्षण करणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. 
                 
२७ सप्टेंबर हा दिवस संपूर्ण जगामध्ये जागतिक पर्यटन दिन म्हणून साजरा केला जातो. त्या निमित्त आयोजित या वेबिनार प्रसंगी कला व वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. टी. आर. सावंत उपस्थित होते. वेबिनारचे स्वागत व प्रास्ताविक भूगोल विभाग प्रमुख  डॉ. नितीन विनायक गायकवाड यांनी केले तर आभार डॉ. महेश कोल्हाळ यांनी मानले. सूत्रसंचालन डॉ. अमोल कुंभार यांनी केले. या वेबिनारसाठी महाविद्यालयातील वरिष्ठ विभागातील प्राध्यापक तसेच विद्यार्थी उपस्थित होते.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)