डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी
डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी
सांगली : येथील भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून उपस्थितांनी विनम्र अभिवादन केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य प्रा. डॉ. व्ही. ए. रणखांबे म्हणाले की, ज्या काळात स्त्रियांना समाजात कोणताही मान-सन्मान नव्हता, त्या प्रतिकूल परिस्थितीत सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाच्या माध्यमातून स्त्रियांना नवी दिशा दिली. आज स्त्रिया विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करत असून, या यशामागे सावित्रीबाई फुले यांच्या त्याग, संघर्ष व दूरदृष्टीचे मोठे योगदान आहे, असे त्यांनी सांगितले.
यानंतर उपप्राचार्य डॉ. अमित सुपले यांनी पुणे येथील भिडे वाड्यात १ जानेवारी १८४८ रोजी सुरू झालेल्या पहिल्या मुलींच्या शाळेचा उल्लेख केला. सर्व जाती-धर्मांसाठी शिक्षण खुले करून सावित्रीबाई फुले यांनी सामाजिक समतेची पायाभरणी केली. समाजसुधारणेच्या प्रत्येक कार्यात त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांना मोलाची साथ दिली, असेही त्यांनी नमूद केले.
या प्रसंगी सूक्ष्मजीवशास्त्र विभागप्रमुख प्रा. कु. भारती भावीकट्टी यांनी सावित्रीबाई फुले या आद्य शिक्षिका, समाजसुधारक व महान सामाजिक विचारवंत असल्याचे सांगितले. समाजाच्या तीव्र विरोधाला सामोरे जात शेणगोळे, अपमान सहन करूनही त्यांनी मुलींच्या शिक्षणाचा ध्यास सोडला नाही. विधवा महिलांसाठी आश्रयगृहे, बालहत्या प्रतिबंध, अस्पृश्यता विरोध व स्त्री-पुरुष समानतेसाठी त्यांनी आयुष्य वेचले. आजच्या काळात सामाजिक असमानता व अन्याय दूर करण्यासाठी कार्य करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे त्यांनी प्रतिपादन केले.
यावेळी कनिष्ठ विभागप्रमुख प्रा. अरुण जाधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. वर्षा कुंभार यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने करण्यात आले.
या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)
Post a Comment