Header Ads

Loknyay Marathi

राजर्षी शाहू महाराजांनी सामाजिक समरसता निर्माण केली : चिंतामणी सहस्रबुद्धे

राजर्षी शाहू महाराजांनी सामाजिक समरसता निर्माण केली : चिंतामणी सहस्रबुद्धे


( डॉ.पतंगराव कदम महाविद्यालयात राजर्षी शाहू महाराज शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती निमित्त व्याख्यानाचे आयोजन)


सांगली : राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या संस्थानामध्ये विधवा पुनर्विवाह, आंतरजातीय विवाह यांसारख्या अनिष्ट समजल्या जाणाऱ्या रूढींना कायद्याने मान्यता दिली. बहुजन विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे म्हणून वस्तीगृहाची निर्मिती करून समाजातील सर्व जाती, धर्माच्या मुलांसाठी स्वतंत्र वसतिगृहे सुरू केली. समाजातील सर्व घटकासाठी आरक्षणाचा कायदा करून समाजामध्ये सामाजिक समरसता कशी निर्माण होईल याकडे त्यांनी लक्ष दिले असे प्रतिपादन चिंतामणी सहस्रबुद्धे यांनी केले.
    
भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात लोकराजा राजर्षी शाहू महाराज शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती निमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुढारी वृत्तपत्राचे माजी संपादक चिंतामणी सहस्त्रबुद्धे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
    
‘शाहू विचार’ या विषयावर सहस्त्रबुद्धे पुढे म्हणाले की, 'बहुजन समाजाला प्रेरणा देणारे तसेच लोकांच्या समस्या सोडवणारे व आपल्या कृतीतून कार्य करणारे असे एकमेव राजा राजर्षी शाहू महाराज होते. कोल्हापूर संस्थानाची विसाव्या वर्षी त्यांनी सूत्रे हाती घेतली. त्यांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले त्यामुळे बहुजन मुले शिक्षित बनली. शाहू महाराजांच्या विचारात दूरदृष्टी होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षणासाठी पूर्ण मदत त्यांनी केली. आपल्या संस्थानामध्ये सर्वप्रथम होमिओपॅथिक हॉस्पिटल, सहकारी संस्था, साखर कारखाना, सूतगिरणी, राधानगरी धरण निर्माण केले. तसेच चित्रकला, कुस्ती अशा कला गुणांना आपल्याला संस्थानामध्ये वाव दिला. असे बहुजन उद्धारक, बहुजनांचे पालक म्हणून राजर्षी शाहू महाराजांना ओळखले जाते.'

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे आपल्या मनोगतात म्हणाले की, 'महाराष्ट्राने देशाला अनेक थोर समाजसुधारक दिले, त्यापैकी समतेची शिकवण देणारे राजर्षी शाहू महाराज हे एक प्रमुख होते. राजर्षी शाहू महाराजांनी महाराष्ट्राला अनेक नव्या परंपरा घालून दिल्या. समाजामध्ये राहून समाजाचे प्रश्न सोडविण्याचे काम त्यांनी केले. आठरा पगड जातीचे नेते म्हणून त्यांना ओळखले जाते. समाजातील सर्व घटकांची प्रगती व्हावी यासाठी त्यांनी कार्य केले. बहुजन समाजाच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न पाहणारे राजर्षी शाहू महाराज हे सत्यशोधक चळवळीचे पाईक होते. सामान्य माणसाला न्याय, हक्क मिळवून देणारा लोकराजा होते. त्यांनी सक्तीचे व मोफत प्राथमिक शिक्षण योजना अमलात आणली. त्याचबरोबर गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजना सुरू केली. अशा या थोर राजाची शिकवण आजही समाजाला प्रेरणा देणारी आहे.'


यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अमित सुपले, प्रा. अरूण जाधव उपस्थित होते. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. आर. एन. देशमुख यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. सौ.आर. डी. वाघमारे यांनी केले. तर या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा.अमोल कुंभार यांनी केले.

(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)