Header Ads

Loknyay Marathi

राष्ट्रीय सेवा योजना म्हणजे व्यक्तिमत्व विकास करणारी कार्यशाळा : प्राचार्य डॉ. शिवाजीराव भोसले

राष्ट्रीय सेवा योजना म्हणजे व्यक्तिमत्व विकास करणारी कार्यशाळा : प्राचार्य डॉ. शिवाजीराव भोसले

सांगली: विद्यार्थ्यांच्या अंगी शिस्त, सहकार्य, स्वावलंबन, ऐक्य हे गुण रुजवायचे असतील तर राष्ट्रीय सेवा योजनेशिवाय पर्याय नाही. राष्ट्रीय सेवा योजना म्हणजे व्यक्तिमत्व विकास घडविणारी कार्यशाळा आहे असे प्रतिपादन  प्राचार्य डॉ. शिवाजीराव भोसले यांनी केले. येथील भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय येथे राष्ट्रीय सेवा  योजनेच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी बोलत होते. या वेळी अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.जी.कणसे होते. पुढे बोलताना भोसले म्हणाले की, मानवी जीवनामध्ये श्रमप्रतिष्ठेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून आपण श्रमसंस्काराची बीजे विद्यार्थ्यांमध्ये रुजवू शकतो. यामुळे स्वतःचा व समाजाचा विकास साधण्यास मदत होईल.



अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना डॉ. कणसे म्हणाले की, तंत्रज्ञानाच्या युगात आजची तरुणाई गुरफटलेली असताना त्यांच्यात श्रमसंस्काराची बीजे रुजविण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना महत्त्वाचे कार्य करत असते. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास अशा उपक्रमांमधून होत असतो. म्हणून आपल्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण उत्तम करायची असेल तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेत सहभाग नोंदविला पाहिजे. 

या प्रसंगी कला व वाणिज्य विभागाचे प्रमुख प्रा. टी. आर. सावंत, राष्ट्रीय सेवा योजनेतील सर्व सदस्य, प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. विकास आवळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रूपाली कांबळे यांनी केले तर आभार  प्रा. प्रदर्शन वाय. सी. धुळगंड यांनी केले.



(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)