Header Ads

Loknyay Marathi

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा संपन्न

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा संपन्न


सांगली: येथील भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा नुकताच पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, आपल्या महाविद्यालयातील माजी विद्यार्थी अनेक उच्च पदावर कार्यरत आहेत ही अभिमानाची गोष्ट आहे. व्यस्त कामातून आपला अमूल्य वेळ देऊन वर्षातून किमान एकदा तरी त्यांनी महाविद्यालयाला भेट दिली पाहिजे हीच आमची माफक अपेक्षा असते. त्याचबरोबर महाविद्यालयाच्या वेगवेगळ्या उपक्रमात सहभागी होऊन महाविद्यालयाप्रती असलेले ऋणानुबंध अधिक दृढ केले पाहिजेत. महाविद्यालयाचे दरवाजे आपल्यासाठी सदैव खुले असतील. प्रत्येक विद्यार्थ्याने खारीचा वाटा उचलून महाविद्यालयाच्या प्रगतीसाठी हातभार लावावा असे आवाहन या वेळी त्यांनी केले.या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माजी प्राध्यापक डॉ. बी डी. पाटील आणि डॉ. सौ. प्रभा पाटील उपस्थित होते.
मनोगत व्यक्त करताना डॉ. बी. डी. पाटील म्हणाले की, माजी विद्यार्थी हे महाविद्यालयाची संपत्ती असते. अशा विद्यार्थ्यांना घडवण्यामध्ये डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय नेहमीच अग्रेसर राहिले आहे. महाविद्यालयातील कर्मचारी आणि विद्यार्थी यांच्यातील सुसंवाद नेहमी वाढला पाहिजे. महाविद्यालयातून मिळालेले संस्कार विद्यार्थ्यांसाठी शिदोरी असते. हे संस्कार विद्यार्थ्यांना आयुष्यभर उपयोगी पडतात. तर डॉ. सौ. प्रभा पाटील म्हणाल्या की, ध्येय, कष्ट आणि जिज्ञासा प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या अंगी जोपासले तर त्यातून एक चांगला नागरिक घडू शकतो. आपल्या महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी मेळावा नेहमीच आनंददायी आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडत असतो. डॉ. पतंगराव कदम साहेबांच्या विचारांचा वसा आणि वारसा समाजापर्यंत पोहोचवण्याचे काम विद्यार्थ्यांनी केले पाहिजे असे मत त्यांनी या वेळी व्यक्त केले.
या वेळी अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून जुन्या आठवणींना उजाळा दिला. 
  
या प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. शिवाजीराव बोऱ्हाडे, डॉ. अमित सुपले, कनिष्ठ विभाग प्रमुख प्रा. अरूण जाधव उपस्थित होते. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा. डॉ. आर. एन. देशमुख यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. डॉ. रुपाली कांबळे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. टी. आर. सावंत यांनी केले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर सेवक व माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)