Header Ads

Loknyay Marathi

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात सोमवारी पाचवे ज्ञानभारती मराठी साहित्य संमेलन

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात सोमवारी पाचवे ज्ञानभारती मराठी साहित्य संमेलन


सांगली:
         भारती विद्यापीठाचे संस्थापक कुलपती व महाराष्ट्र राज्याचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री स्व. डॉ. पतंगराव कदम यांच्या ७९व्या जयंतीनिमित्त व भारती विद्यापीठाचे कार्यवाह, महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री आमदार डॉ. विश्वजीत कदम यांच्या वाढदिवसानिमित्त डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात सोमवार दि. ९ जानेवारी २०२३ रोजी पाचव्या ज्ञानभारती मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 
         
या साहित्य संमेलनासाठी संमेलनाध्यक्ष म्हणून सुप्रसिद्ध कवी अशोक नायगावकर उपस्थित राहणार असून संमेलनाचे उद्घाटन भारती विद्यापीठाच्या शालेय समितीच्या अध्यक्षा विजयमाला पतंगराव कदम यांच्या हस्ते होणार आहे. संमेलनामध्ये साहित्य व समाज या विषयावर प्रा. वैजनाथ महाजन यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद आयोजित करण्यात आला असून त्यामध्ये प्रा. डॉ. रणधीर शिंदे, प्रा. प्रदीप पाटील, प्रा. मिलिंद जोशी सहभागी होणार आहेत. त्याबरोबरच कवयित्री व लेखिका प्रतिभा जगदाळे यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलनदेखील होणार असून दयासागर बन्ने, वसंत पाटील, नितीन चंदनशिवे, प्रा. लता ऐवळे, डॉ. सुनंदा शेळके आदी कवी कविता वाचन करणार आहेत. साहित्य संमेलनाचा समारोप प्रा. डॉ. सुनीता बोर्डे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. संमेलनाबरोबरच महाविद्यालयामध्ये कृषी प्रदर्शन, रक्तदान शिबिर यांचेसुद्धा आयोजन करण्यात आले असल्याचे डॉ. कणसे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. कोरोना महामारीमुळे गेली दोन वर्षे संमेलन होऊ शकले नाही. यावर्षीचे संमेलन हे सर्वांसाठी खुले असून साहित्य प्रेमींनी मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित राहावे तसेच रक्तदान शिबिरात सहभागी होऊन कृषी प्रदर्शनाचाही लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. कणसे यांनी केले आहे. यावेळी प्रा. (डॉ.) शिवाजी बो-हाडे, प्रा. तानाजी सावंत, डॉ. अमित सुपले, प्रा. सतीश कांबळे आदी उपस्थित होते.

(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)