राज्यघटना हा भारतीय लोकशाहीचा आधारस्तंभ : दीपक चव्हाण
राज्यघटना हा भारतीय लोकशाहीचा आधारस्तंभ : दीपक चव्हाण
सांगली : 'भारताची राज्यघटना ही एक आदर्श राज्यघटना आहे. या राज्यघटनेचा मूलभूत पाया प्रत्येकाने समजून घेतला पाहिजे. कारण राज्यघटना हा भारतीय लोकशाहीचा आधारस्तंभ आहे.' असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार दीपक चव्हाण यांनी केले. येथील भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय व समाज कल्याण विभाग सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने 'समता पर्व सप्ताह' निमित्त आयोजित 'जागर संविधानाचा' या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे उपस्थित होते.
पुढे बोलताना चव्हाण म्हणाले की, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारच हे देशाला घडविणारे आहेत. जर भारतीय राज्यघटना नसती तर देश गुलामगिरीत झुकला असता. त्यामुळे प्रत्येकाने संविधानाचा आदर करून त्यातील मूल्ये आत्मसात केली पाहिजेत. संविधान अमलात आणल्यामुळे समाजामध्ये ऐक्याची भावना निर्माण झाली.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना डॉ. डी जी. कणसे म्हणाले की, भारतीय राज्यघटनेतील स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही मूल्ये ऐक्य जपणारी आहे. आपल्या देशाला राज्यघटनेमुळेच स्थैर्य प्राप्त झाले. देशाच्या विकासासाठी ही मूल्ये अत्यंत महत्त्वाची आहेत.
यावेळी मराठी इंडियन आयडॉल विजेती सोनाली ककडे आणि दीपक चव्हाण यांनी देशभक्तीपर गायनाचा कार्यक्रम सादर केला. त्याला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
स्वागत व प्रास्ताविक महाविद्यालयाचे कला व वाणिज्य विभागप्रमुख प्रा. टी. आर. सावंत यांनी केले. यावेळी कनिष्ठ विभागप्रमुख प्रा.ए. एल.जाधव, प्रा. एस. डी. पाकले, प्रा. सतिश कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. नितीन गायकवाड यांनी केले. तर सूत्रसंचालन डॉ. वर्षा कुंभार यांनी केले. या प्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)
Post a Comment