Header Ads

Loknyay Marathi

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात जागतिक दिव्यांग दिन साजरा

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात जागतिक दिव्यांग दिन साजरा



दिव्यांग व्यक्तींच्या बाबतीत समाजाने फक्त सहनभुती ठेवून चालणार नाही तर त्यांच्याबरोबर माणुसकीच्या नात्याने वागण्याची गरज आहे. त्याशिवाय खऱ्या अर्थाने सर्वागीण विकास होणार नाही असे मत प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे यांनी व्यक्त केले.

सांगली येथील डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात सांस्कृतिक विभागाच्या वतीने जागतिक दिव्यांग दिनाच्या निमित्ताने महाविद्यालयातील दिव्यांग सेवक दत्तात्रय मोहिते व सुनील कदम यांचा भावपूर्ण सत्कार शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे यांच्या हस्ते ग्रंथ देऊन करण्यात आला.

स्वागत सांस्कृतिक विभाग प्रमुख  प्रा. संजय ठिगळे यांनी केले.स्वागतपर भाषणात प्रा. संजय ठिगळे म्हणाले की, समाजात असलेले दिव्यांग हे समाजाचे अविभाज्य घटक असून त्यांना सर्व प्रकारची मदत करणे प्रत्येकाचे नैतिक कर्तव्य आहे.

मार्गदर्शनपर भाषणात प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे म्हणाले की. अनेक दिव्यांग व्यक्ती वेगवेगळ्या क्षेत्रात जे यश संपादन करीत आहेत त्याचा तरुणाईने आदर्श घेऊन कार्यरत राहण्याची गरज आहे .प्रत्येक दिव्यांगामध्ये एक कौशल्य असते ते ओळखण्याची गरज आहे. त्याशिवाय समाजाचा आणि अप्रत्यक्षपणे देशाचा विकास होणार नाही. त्यासाठी दिव्यांग व्यक्तींबाबत सामान्य जनतेत जनजागृती निर्माण करण्याची गरज आहे.

याप्रसंगी दत्तात्रय मोहिते यांनी मनोगत व्यक्त केले.उपस्थितांचे आभार ग्रंथपाल जयश्री हाटकर यांनी मानले. या प्रसंगी विज्ञान विभाग प्रमुख प्रा. डॉ. प्रभा पाटील, कला व वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. टी. आर. सावंत त्याचबरोबर विविध विभाग प्रमुख व प्राध्यापक उपस्थित होते.