yuva MAharashtra शिक्षण हे फक्त ज्ञानप्राप्तीचे साधन नाही तर समाजपरिवर्तनाचे माध्यम: डॉ. माणिकराव साळुंखे (डॉ.पतंगराव कदम महाविद्यालयामध्ये आदर्श प्राचार्य डॉ. कणसे व आदर्श शिक्षक डॉ. माळी यांचा गौरव) - BV DPKM News

Header Ads

Loknyay Marathi

शिक्षण हे फक्त ज्ञानप्राप्तीचे साधन नाही तर समाजपरिवर्तनाचे माध्यम: डॉ. माणिकराव साळुंखे (डॉ.पतंगराव कदम महाविद्यालयामध्ये आदर्श प्राचार्य डॉ. कणसे व आदर्श शिक्षक डॉ. माळी यांचा गौरव)

शिक्षण हे फक्त ज्ञानप्राप्तीचे साधन नाही तर समाजपरिवर्तनाचे माध्यम: डॉ. माणिकराव साळुंखे  (डॉ.पतंगराव कदम महाविद्यालयामध्ये आदर्श प्राचार्य डॉ. कणसे व आदर्श शिक्षक डॉ. माळी यांचा गौरव)








सांगली: शिक्षणाने माणूस बदलतो, माणूस बदलला की समाज बदलतो आणि समाज बदलला की राष्ट्र बदलते. म्हणून शिक्षण हे फक्त ज्ञानप्राप्तीचे साधन नाही तर समाजपरिवर्तनाचे एक उत्तम माध्यम आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनी केले. भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाने आयोजित केलेल्या प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे व प्रा. डॉ. जी. व्ही. माळी यांना महाराष्ट्र शासनाचा ‘डॉ. जे. पी. नाईक आदर्श प्राचार्य व शिक्षक पुरस्कार’ मिळाल्याबद्दल विशेष सत्कार समारंभात ते बोलत होते. या प्रसंगी भारती विद्यापीठाचे सहकार्यवाह डॉ. एम. एस. सगरे अध्यक्ष स्थानी होते. तर शिवाजी विद्यापीठ, महाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळाचे माजी संचालक डॉ. डी. आर. मोरे, कडेगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. जितेश कदम, कासेगाव एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्राचार्य डॉ. आर. डी. सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.

      डॉ. साळुंखे पुढे म्हणाले की, ‘शिक्षणतज्ज्ञ डॉ. जे. पी. नाईक यांनी शैक्षणिक धोरणामध्ये मूल्ये रुजवणारे शिक्षण, कौशल्याधारित शिक्षण, गुणवत्तापूर्ण शिक्षण, विद्यार्थीकेंद्रीत शिक्षण पद्धतींचा अवलंब करावा असे सूचित केले होते. त्या अनुषंगाने डॉ. कणसे व डॉ. माळी यांनी आपल्या शैक्षणिक कारकिर्दीत विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून वरील शिक्षण पद्धतीचा अवलंब केला म्हणून त्यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या युगात शिक्षकांपुढे अनेक आव्हाने आहेत. त्यादृष्टीने शिक्षकाने सजग राहिले पाहिजे. ‘

          अध्यक्षीय भाषणात डॉ. एम.एस. सगरे म्हणाले की, ‘हा पुरस्कार म्हणजे डॉ. कणसे व डॉ. माळी यांच्या कार्याची पावती आहे. असे पुरस्कार मिळाल्यामुळे अधिक जबाबदारी वाढते. तसेच काम करण्यास उत्साह वाढतो. समाज निर्मिती आणि राष्ट्र निर्मितीमध्ये शिक्षकाची भूमिका महत्त्वाची आहे. आजची शैक्षणिक परिस्थिती ही डागाळलेली आहे. ती सुधारण्याचे काम शिक्षकाचे आहे.’

      आदर्श प्राचार्य आणि आदर्श प्राध्यापक असे एकाच वेळी दोन पुरस्कार मिळाले ही भारती विद्यापीठाच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे. असे गौरवोद्गार डॉ. जितेश कदम यांनी या वेळी काढले. पुढे ते असेही म्हणाले की, या दोघांच्या वागण्या-बोलण्यात जी कृतज्ञता आहे ती कमालीची आहे. आजच्या पिढीने हा आदर्श घेतला पाहिजे.  

      सत्कार समारंभात मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ. कणसे म्हणाले की, माझ्या आयुष्याला उभारी देणारे आदरणीय डॉ. पतंगराव कदम यांना हा पुरस्कार समर्पित करत आहे. कारण भारती विद्यापीठामुळे मी इथपर्यंत पोहोचलो. माझ्या शैक्षणिक कार्याचा आढावा घेता मला आदरणीय मा. विजयमाला कदम, डॉ. शिवाजीराव कदम यांचे आशीर्वाद लाभले तर भारती विद्यापीठाचे कार्यवाह डॉ. विश्वजित कदम यांचे मला मार्गदर्शन मिळाले. ज्यांच्या पावलावर पाऊल ठेवून प्राचार्य पदावर कार्यरत आहे असे माझे गुरू डॉ. सगरे सर, डॉ. के.डी. जाधव सर यांचे मी ऋणी आहे. मला मिळालेला हा पुरस्कार माझ्या एकट्याचा नसून माझे विद्यार्थी, सहकारी, हितचिंतकांचा आहे.’ तर डॉ. माळी म्हणाले, ‘ वैयक्तिक स्वार्थापोटी मी कोणतेही काम केले नाही. फळाची अपेक्षा न ठेवता फक्त काम करत गेलो. ‌हा पुरस्कार म्हणजे दोन तीन वर्षांच्या कामाची पावती नाही तर ३३ वर्षांची कामावरील निष्ठा आहे. माझ्या संशोधन कार्याची दारं या पुढेही कायम खुली राहणार आहेत.’

      या सत्कार सोहळ्यात प्राचार्य डॉ. आर. डी. सावंत, डॉ. डी. आर. मोरे, प्राचार्य डॉ. उल्हास माळकर, प्रा. विजय पाटील, प्रा. प्रदीप पाटील, प्रा. संजय ठिगळे, प्रा. नीता पाटील, डॉ. जया कुऱ्हेकर इत्यादी मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रस्ताविक प्रा. भारती भाविकट्टी यांनी केले, सूत्रसंचालन प्रा. सूर्यकांत बुरुंग यांनी केले तर आभार प्रदर्शन उपप्राचार्य डॉ. अमित सुपले यांनी मानले. या सत्कार सोहळ्याला विविध महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक, माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)