yuva MAharashtra उत्कृष्ट कार्याची दखल; प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे, प्रा. डॉ. जी. व्ही. माळी यांना राज्य शासनाचा पुरस्कार - BV DPKM News

Header Ads

Loknyay Marathi

उत्कृष्ट कार्याची दखल; प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे, प्रा. डॉ. जी. व्ही. माळी यांना राज्य शासनाचा पुरस्कार

 उत्कृष्ट कार्याची दखल; प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे, प्रा. डॉ. जी. व्ही. माळी यांना राज्य शासनाचा पुरस्कार 

सांगली : भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे आणि सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. जी. व्ही. माळी यांना महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने दिला जाणारा ‘डॉ. जे. पी. नाईक’ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला. महाराष्ट्र राज्याचे उच्च शिक्षण मंत्री मा. चंद्रकांत (दादा) पाटील व  राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांच्या शुभहस्ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शिक्षकदिनाच्या पार्श्वभूमीवर या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. 

     प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे हे भारती विद्यापीठाच्या विविध घटक शाखेत चार दशके प्राध्यापक व प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी अध्यापनाबरोबरच  संशोधन आणि नवोपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले आहेत. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांचे उत्कृष्ट नियोजन, मुला-मुलींच्या वसतिगृहाचे प्रमुख म्हणून अतिरिक्त जबाबदारी, नॅक पुनर्मूल्यांकनात उत्कृष्ट श्रेणी मिळवून देण्यात महत्त्वाचे योगदान, अनेक देशांचे अभ्यासदौरे, पीएच. डी. मार्गदर्शक इत्यादी अनेक कामे त्यांनी निष्ठेने केली आहेत. त्याचबरोबर डॉ. कणसे यांनी शिवाजी विद्यापीठ व्यवस्थापन परिषद, अधिसभा व विद्या परिषदेवर सभासद, अनेक विद्यापीठांच्या निवड समित्यांवर कुलगुरूंचे प्रतिनिधी, अनेक प्रतिष्ठित महाविद्यालयांच्या गव्हर्निंग बॉडीवर कुलगुरू नियुक्त सदस्य व अभ्यास मंडळावर सदस्य म्हणून आपल्या कार्याची मोहोर उमटवली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना २०२४-२५ मधील ‘डॉ. जे. पी नाईक आदर्श प्राचार्य’ पुरस्कार मिळाला आहे.

     महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे ज्येष्ठ प्राध्यापक डॉ. जी. व्ही. माळी यांना ३४ वर्षांचा अध्यापन अनुभव असून संशोधन क्षेत्रात त्यांनी महत्त्वाचे कार्य केले आहे. त्यांचे अनेक शोधनिबंध राष्ट्रीय -आंतरराष्ट्रीय जर्नल मधून प्रसिद्ध झाले आहेत. त्याचबरोबर त्यांना अनेक पेटेंट मिळाले आहेत. त्यांच्या  मार्गदर्शनाखाली आतापर्यंत पाच विद्यार्थ्यांनी पीएच. डी. पदवी प्राप्त केली आहे. डॉ. माळी यांनी अनेक वर्षे ‘नॅक’चे समन्वयक म्हणून काम केले आहे. त्याचबरोबर त्यांनी अभ्यासक्रमासाठी पुस्तकांचे लेखन केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल म्हणून त्यांना २०२५-२६ मधील ‘डॉ. जे. पी. नाईक आदर्श प्राध्यापक’ पुरस्कार मिळाला आहे.

     त्यांना मिळालेल्या या महत्त्वाच्या पुरस्काराबद्दल भारती विद्यापीठाचे कार्यवाह डॉ. विश्वजित कदम, शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षा मा. विजयमाला कदम, कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, भारती विद्यापीठाचे पदाधिकारी, शिवाजी विद्यापीठ परिक्षेत्रातील विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक आणि हितचिंतकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)