Header Ads

Loknyay Marathi

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तत्त्वज्ञानाने सामाजिक क्रांती घडून आली : प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तत्त्वज्ञानाने सामाजिक क्रांती घडून आली : प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे


सांगली : 'सामाजिक क्रांती घडवून आणायची असेल तर शिक्षण हे सर्वात महत्त्वाचे साधन आहे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ओळखले होते. म्हणून 'शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा' हा मूलमंत्र देतानाही त्यांनी सर्वात प्रथम शिक्षणाला महत्त्व दिले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या  शैक्षणिक तत्त्वज्ञानाने खऱ्या अर्थाने सामाजिक क्रांती घडून आली' असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.  डी. जी. कणसे यांनी केले. येथील भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंती निमित्त प्रतिमा पूजन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.
      
यावेळी बोलताना ते म्हणाले की, भारत हा आदर्श लोकशाहीचा देश म्हणून जगभरात ओळखला जातो. या देशाची लोकशाही ही संविधानावर आधारलेली आहे.  हे संविधान बनवण्याचे अत्यंत महत्त्वपूर्ण काम भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले.  ज्या काळात स्त्रियांना आणि अस्पृश्य समाजाला अत्यंत हीन समजले जात होते, त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे  महत्त्वाचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. अस्पृश्य समाजाला जर शिक्षण मिळाले तर तो आपल्या समाजाविषयी जागरूक राहील आणि तो हक्कासाठी प्रयत्नशील राहील याची त्यांना जाणीव होती. म्हणून शिक्षणाच्या माध्यमातून अस्पृश्यांची अस्मिता जागी करण्याचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले. त्यामुळेच आज समाजामध्ये एकता, समता आणि मानवतावादी दृष्टिकोन टिकून आहे.  शिकल्याशिवाय माणसाला न्याय, अन्याय आणि हक्क याची जाणीव होणार नाही असा मूलमंत्र त्यांनी दिला. त्यांच्या विचारमूल्यांचे जतन होणे गरजेचे आहे.
        
या वेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अमित सुपले उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभागप्रमुख  डॉ. नितीन गायकवाड यांनी केले. या प्रसंगी महाविद्यालयातील  प्राध्यापक व शिक्षकेतर सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)