Header Ads

Loknyay Marathi

डॉ. पतंगराव कदम हे बहुजन समाजाचे भाग्यविधाते : डॉ. यशवंत पाटणे

डॉ. पतंगराव कदम हे बहुजन समाजाचे भाग्यविधाते : डॉ. यशवंत पाटणे


(डॉ. पतंगराव कदम साहेब यांच्या सहाव्या स्मृतिदिनानिमित्त व्याख्यानाचे आयोजन)


सांगली : सहकार आणि शिक्षण या चळवळी पक्षीय चळवळी नसतात, तर त्या लोकशाही बळकट करणाऱ्या चळवळी असतात. त्या परस्परांनी प्रेरक आणि पोषक असतात, हे डॉ. पतंगराव कदम यांनी स्वकर्तृत्वने सिद्ध केले आहे.  शैक्षणिक आणि सहकारी क्षेत्राच्या समृद्धीसाठी बहुमोल योगदान देणारे पतंगराव कदम हे बहुजन समाजाचे भाग्यविधाते आहेत असे प्रतिपादन माजी प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे यांनी केले. येथील भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानमालेत ते बोलत होते. यावेळी भारती विद्यापीठ सांगली विभागाचे मानद संचालक डॉ. एच. एम. कदम, महाविद्यालयाचे प्राचार्य व शिवाजी विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे माजी सदस्य डॉ. डी. जी. कणसे, उपप्राचार्य डॉ. अमित सुपले,  प्रा. कु. भारती भावीकट्टी, कनिष्ठ विभाग प्रमुख प्रा. अरुण जाधव उपस्थित होते.


डॉ पतंगराव कदम साहेब यांच्या सहाव्या स्मृतिदिनानिमित्त 'आठवणीतले डॉ. पतंगराव कदम साहेब' या विषयावर बोलताना पाटणे पुढे म्हणाले की, डॉ. पतंगराव कदम यांना कोणतीही आर्थिक व कौटुंबिक पाठबळ नसताना त्यांनी इच्छाशक्तीच्या बळावर भारती विद्यापीठाची स्थापना केली.  त्यांच्या अथक ज्ञानसाधनेमुळे ग्रामीण भागातील अनेक गोरगरीब लोकांना ज्ञानाच्या प्रकाश वाटेवर येता आले.  त्यांनी उभारलेल्या साखरकारखाना, सूतगिरणी, शेतीपूरक उद्योग आशा सहकारी संस्थांमुळे कष्टकरी, शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले.


संकल्प आणि साधना, नीतिमत्ता आणि मानवता यांच्या एकरुपतेत कदम यांचे मोठेपण आणि देवपण सामावलेले आहे. सध्या सत्तेचा कल बघून राजकारणी नेते पावले टाकतात पण काळाची पावले ओळखून स्वतःच ज्ञानसत्ता निर्माण करणारे डॉ. पतंगराव कदम हे दूरदृष्टीचे लोकनेते होते. नव्या पिढीने त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा वारसा जपला पाहिजे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.


या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी.  कणसे उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, डॉ. पतंगराव कदम साहेबांचे नेतृत्व प्रभावी होते तितकेच त्यांचे दातृत्वही महान होते. आपल्या ताटातील अर्धी भाकरी भुकेल्याला देण्याची दानत त्यांची होती. आपुलकी, कौतुक करणे, सामान्य माणसात रमणे हे त्यांच्या अंगी असलेले गुण सर्वांना आपलेपणाची भावना निर्माण करणारे होते. माणसांसाठी जगतात ती खरी देव माणसं असतात. डॉ. पतंगराव कदम साहेबांच्या विचारात आणि आचरणात देवत्व होते म्हणून त्यांनी लाखो विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कार्य करून मानवतावादी दृष्टिकोन जपला.

या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा. कु. भारती भावीकट्टी यांनी केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आर. एन. देशमुख यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. अमित सुपले यांनी केले. याप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)