Header Ads

Loknyay Marathi

महात्मा गांधीजींच्या सत्य, अहिंसेची देशाला गरज: डॉ. डी.जी. कणसे

महात्मा गांधीजींच्या सत्य, अहिंसेची देशाला गरज: डॉ. डी.जी. कणसे


सांगली : 'दहशतीने भयग्रस्त झालेले जग, एकमेकांविरोधात आक्रमक झालेले देश आणि वाढलेली अशांतता अशा वातावरणात राहत असलेल्या समाजाला आज महात्मा गांधीजींच्या सत्य आणि अहिंसा या तत्त्वाची गरज आहे' असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.कणसे यांनी केले. येथील भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या प्रतिमा पूजन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.
या वेळी बोलताना ते म्हणाले की, साधी राहणी व उच्च विचारसरणी आचरणात आणणाऱ्या गांधीजींनी सत्य, अहिंसा, शांतता आणि सहकार ही आदर्श मूल्ये आयुष्यभर जोपासली. या मूल्यांचे आचरण करून गांधीजींनी समाजापुढे जो आदर्श निर्माण करून दिला आहे तो वारसा पुढे प्रत्येकाने चालवला पाहिजे. त्याचप्रमाणे खेड्याविषयी आपुलकी, स्वदेशीचा पुरस्कार, सत्याची शिकवण महात्मा गांधीजींनी स्वतः आचरणात आणली. केवळ भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला अहिंसेचा अर्थ त्यांनी समजावून सांगितला. म्हणूनच त्यांचा जन्म दिवस हा 'जागतिक अहिंसा दिन' म्हणून पाळला जातो.


लालबहादूर शास्त्री यांच्या विषयी बोलताना डॉ. कणसे म्हणाले की, लालबहादूर शास्त्री यांच्या अंगी नम्रता, दृढता व आंतरिक शक्ती होती म्हणून ते समाजात लोकप्रिय होते. आजच्या तरुणांनी शास्त्रींच्या अंगी असलेले हे गुण आत्मसात करणे गरजेचे आहे. त्यांचा 'जय जवान, जय किसान!' हा नारा आजही देशासाठी प्रेरणादायी आहे. या कार्यक्रमाचे औचित्य साधून महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागांतर्गत सांगलवाडी परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.


या वेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अमित सुपले , कला व वाणिज्य विभागप्रमुख प्रा. टी. आर. सावंत उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. नितीन गायकवाड, राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख डॉ. विकास आवळे यांनी केले. या प्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक उपस्थित होते.

(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)