Header Ads

Loknyay Marathi

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण संपन्न

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण संपन्न


सांगली: येथील भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार  पडला. या कार्यक्रमाला भारती विद्यापीठाचे  विभागीय संचालक मा. डॉ. एच. एम. कदम, लेखक व कथा कथनकार जयवंत आवटे, ज्येष्ठ समीक्षक वैजनाथ महाजन,  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे आदी मान्यवर उपस्थित होते.  
       
आपल्या मनोगतात जयवंत आवटे म्हणाले की, प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या जीवनात उच्च ध्येय बाळगले पाहिजे.  त्यासाठी कष्टाला पर्याय नाही. डॉ. पतंगराव कदम यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून बेभान होऊन काम करायला शिका आणि आपले स्वप्न पूर्ण करा. यावेळी त्यांनी 'जाणती' या कथेचे कथन केले. प्रा. वैजनाथ महाजन मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, वाचनाने विचाराची प्रगल्भता वाढते.  त्यासाठी प्रत्येकाने वाचन केले पाहिजे. आपले ज्ञान  अद्ययावत असणे आवश्यक आहे. केवळ  परीक्षा पास होणे हे अंतिम उद्दिष्ट नको तर अवांतर वाचनाची सवय लावली पाहिजे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, ज्या विद्यार्थ्यांना पारितोषिक मिळाले त्यांनी या पुढे अधिक जबाबदारीने वागले पाहिजे. या पेक्षा उच्च दर्जाचे पारितोषिक कसे मिळेल याचा विचार करा तर ज्यांना पारितोषिक मिळाले नाही त्यांनी नाराज न होता नव्या उत्साहाने स्पर्धेत सहभागी व्हा आणि यश मिळवा. हे स्पर्धेचे युग असल्यामुळे आयुष्यात प्रत्येकाला अनेक स्पर्धांना सामोरे जावे लागणार आहे. 
     
या प्रसंगी वर्षभरात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
     
या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक उपप्राचार्य डॉ. शिवाजीराव बोऱ्हाडे यांनी केले.  प्रा. टी. आर. सावंत यांनी अहवाल वाचन केले. सूत्रसंचलन प्रा. सौ. भारती भाविकट्टी यांनी केले तर  आभार प्रदर्शन महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अमित सुपले यांनी केले. या कार्यक्रमाचे संयोजन जिमखाना विभाग प्रमुख प्रा. अमर तुपे यांनी  केले होते.  या प्रसंगी  महाविद्यालयातील  प्राध्यापक , शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)