Header Ads

Loknyay Marathi

शिक्षण हे समाज परिवर्तनाचे माध्यम : डॉ. उल्हास माळकर

शिक्षण हे समाज परिवर्तनाचे माध्यम : डॉ. उल्हास माळकर


सांगली:  सर्वांना हवे ते कौशल्य प्राप्त करून देणारे शिक्षण मिळाले पाहिजे.  समाजातील सर्व घटकांना शिक्षण मिळाले पाहिजे. कारण शिक्षण हे समाज परिवर्तनाचे महत्त्वाचे माध्यम आहे असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. उल्हास माळकर यांनी केले. येथील भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात शिक्षक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानात ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, शिक्षणामुळे योग्य काय आणि अयोग्य काय याची जाणीव  होते. शिक्षण प्रक्रियेत शिक्षकाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्या देशात शिक्षक  हा  सर्वोच्च पदापर्यंत पोहोचला आहे. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे तत्त्वज्ञानाचे शिक्षक होते. आजच्या शिक्षण प्रणालीत तंत्रज्ञानाला विशेष महत्त्व आहे. जेव्हा तंत्रज्ञानाला तत्त्वज्ञानाची जोड  मिळते तेव्हा समाजाचा शाश्वत विकास होत असतो . 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात ते म्हणाले की, शिक्षक हा समाजातील पिढ्या घडविणारा महत्त्वाचा घटक आहे. नवीन शैक्षणिक धोरणात शिक्षकांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. शिकणे आणि शिकविण्याबरोबरच शिक्षकाने संशोधनाकडेही  लक्ष दिले पाहिजे. नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात केले पाहिजे.

यावेळी सूक्ष्म जीवशास्त्राच्या विभाग प्रमुख प्रा. सौ. भाविकट्टी व रसायनशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. देशमुख यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी महाविद्यालयातील कला व वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. टी. आर. सावंत, कनिष्ठ महाविद्यालय विभाग प्रमुख प्रा. अरुण जाधव उपस्थित होते . या कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. नितीन गायकवाड, डॉ. कृष्णा भवारी, डॉ. वर्षा कुंभार, प्रा. सतिश कांबळे, प्रा. नरेश पवार, प्रा. नंदकुमार नाटके यांनी केले. या  प्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा. टी. आर. सावंत यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. सौ. वर्षा कुंभार यांनी केले तर आभार डॉ. नितीन गायकवाड यांनी मानले.

(Bharari Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)