डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात राजर्षी शाहू महाराजांचा स्मृतिदिन उत्साहात साजरा
डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात राजर्षी शाहू महाराजांचा स्मृतिदिन उत्साहात साजरा
सांगली : भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा स्मृतिदिन विविध कार्यक्रमांचे आयोजन करून उत्साहात साजरा करण्यात आला. राजर्षी शाहू महाराज यांचे हे स्मृतिशताब्दी वर्ष आहे. त्या निमित्ताने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.जी. कणसे म्हणाले की, 'राजर्षि शाहू महाराजांनी महाराष्ट्राला अनेक नव्या परंपरा घालून दिल्या. बहुजन समाजाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी ते प्रयत्नशील राहिले. सत्यशोधक चळवळीचा पाईक होऊन शाहू महाराजांनी अनेक लोकहिताची कामे केली. वेगवेगळ्या जाती-धर्माच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी वसतिगृहे निर्माण करून समानतेची शिकवण दिली. अशा या समाजक्रांतिकारक व सामाजिक सुधारणांचे कृतीशील पुरस्कर्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे कार्य हे वंदनीय आहे.'
या प्रसंगी प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे यांच्या हस्ते 'राजर्षी छत्रपती शाहू यांचे जीवन व कार्य' या विषयावरील भित्तीपत्रकांचे उद्धाटन करण्यात आले. त्याचबरोबर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवायोजनेच्या विद्यार्थ्यांनी 'जात-पातचे बंधन तोडा, भारत जोडा, भारत जोडा' अशा घोषणा देत राष्ट्रीय एकात्मता व सामाजिक जनजागृती निर्माण व्हावी या उद्देशाने सांगलीवाडी परिसरातून रॅली काढण्यात आली. या कार्यक्रमात महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी १०० सेकंद स्तब्ध उभे राहून लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले.
यावेळी महाविद्यालयाच्या विज्ञान विभाग प्रमुख प्रा. डाॅ. सौ. प्रभा पाटील, कला व वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. टी. आर. सावंत उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. नितीन गायकवाड, राष्ट्रीय सेवायोजना विभाग प्रमुख प्रा. डॉ. विकास आवळे यांनी केले. याप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. नितीन गायकवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. कु. रुपाली कांबळे यांनी केले.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)
Post a Comment