आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीत यशवंतराव चव्हाणांचे योगदान मोलाचे : डॉ. डी.जी. कणसे
आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीत यशवंतराव चव्हाणांचे योगदान मोलाचे : डॉ. डी.जी. कणसे
सांगली : आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये ज्या महान व्यक्तींचे योगदान लाभले, त्यांच्यामध्ये यशवंतराव चव्हाण यांचे नाव आपणास अग्रस्थानी घ्यावे लागेल. असे प्रतिपादन डॉ. डी. जी. कणसे यांनी केले. येथील भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या प्रतिमापूजन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, यशवंतराव चव्हाण हे समर्थ प्रशासक आणि कुशल संघटक होते. त्यांच्या दृष्टीने व्यक्तीपेक्षा पक्ष श्रेष्ठ आणि पक्षापेक्षाही देश श्रेष्ठ होता. म्हणून ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदापासून ते भारताचे उपपंतप्रधान, संरक्षणमंत्री, गृहमंत्री, अर्थमंत्री, परराष्ट्रमंत्री अशा विविध महत्त्वाच्या पदांवर विराजमान झाले. राजकारणात असताना त्यांनी सर्व जाती-जमातींना एकत्र घेऊन महाराष्ट्रच नव्हे तर देश एक विशिष्ट उंचीवर नेण्याचा प्रयत्न केला. ते उत्तम वाचक, रसिक आणि प्रतिभासंपन्न साहित्यिक होते. 'कृष्णाकाठ' हे त्यांचे मराठी साहित्यातील वैशिष्ट्यपूर्ण आत्मचरित्र आहे. त्यांचे राजकीय क्षेत्राबरोबरच सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात मोलाचे योगदान आहे.
या वेळी महाविद्यालयाचे कला व वाणिज्य विभागप्रमुख प्रा. टी. आर. सावंत उपस्थित होते. या प्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. नितीन गायकवाड, प्रा. जयश्री हाटकर, डॉ. कृष्णा भवारी, डॉ. वर्षा कुंभार, प्रा. सतीश कांबळे, प्रा. नंदकुमार नाटके यांनी केले.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)
Post a Comment