५ सप्टेंबर : शिक्षक दिन
५ सप्टेंबर : शिक्षक दिन
"गुरु ब्रह्मा, गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः।
गुरुः साक्षात परब्रह्म तस्मैः श्री गुरुवेः नमः।"
भारतीय संस्कृतीत आईनंतर सर्वांत महत्त्वाचे स्थान आहे ते गुरुला. आई जशी मुलांवर संस्कार करते, तसा गुरु हा मुलांना घडवण्याचे, त्यांना सक्षम करण्याचे काम गुरु करतो. जीवनाला दिशा देण्यात आणि आपली जडणघडण करण्यात गुरुचा वाटा खूप मोठा असतो. त्यामुळे शिक्षक दिनाला भारतीय संस्कृतीत अधिक महत्त्व आहे. कोणतीही व्यक्ती ही कायम विद्यार्थीच असते, असे म्हणतात. प्राथमिक गोष्टी आई शिकवते. समाजात वावरण्यापासून ते मनगट बळगट करण्यापर्यंतचे शिक्षण शिक्षक देत असतात. यानंतर खुल्या जगात गेल्यावर स्काय इज द लिमिट, अशी अवस्था सर्वांची होते.
भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस म्हणजेच, ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. शिक्षक दिनाच्या दिवशी विद्यार्थी आपल्या गुरुजनांबद्दल आदराची आणि कृतज्ञतेची भावना व्यक्त करतात. तसेच शिक्षकांच्या भूमिकेचे महत्त्व आणि भविष्यातील पिढ्यांच्या जागरुकतेसाठी हा दिवस साजरा केला जातो. मूळात शिक्षक दिनाची सुरुवात कशी झाली? जागतिक स्तरावर शिक्षक दिन कधी साजरा केला जातो? जाणून घेऊया...
राष्ट्रीय शिक्षक दिन :
भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस म्हणजेच ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. राजकारणात त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. भारताचे उपराष्ट्रपती आणि राष्ट्रपती अशी दोन्ही पदे भूषविली असली, तरी शेवटपर्यंत आदर्श शिक्षकाची ओळख त्यांनी जपली. म्हणूनच त्यांच्या स्मरणार्थ ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला. भारतामध्ये सर्वप्रथम सन १९६२ मध्ये शिक्षक दिन साजरा करण्यात आला. माझा जन्मदिवस शिक्षक दिनाच्या रुपात साजरा करणे माझ्यासाठी गौरवास्पद असेल, असे राधाकृष्णन यांनी सांगितल्याची आठवण सांगितली जाते. शिक्षकांनी केवळ पुस्तकी ज्ञान शिकवण्यापुरते संतुष्ट होऊ नये, तर त्यांनी विद्यार्थ्यांना स्नेह आणि आदरही दिला पाहिजे. फक्त शिक्षक असून सन्मान मिळत नाही, तर हा सन्मान प्राप्त करावा लागतो, असे ते नेहमी सांगत असत.
कोण होते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन?
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म ५ सप्टेंबर १८८८ रोजी आंध्र प्रदेशातील तीरुत्तानी या गावी झाला. डॉ.राधाकृष्णन यांनी आंध्र विद्यापीठ आणि बनारस हिंदू विद्यापीठ यांचे कुलगुरूपद भूषविले. सन १९३१ ते १९३९ या आठ वर्षांच्या काळात ते संयुक्त राष्ट्रसंघात भारताचे प्रतिनिधी होते. सन १९४९ ते १९५२ मध्ये भारत सरकारने रशियातील भारताचा राजदूत म्हणून त्यांची नियुक्ती केली. १९५२ मध्ये ते भारतात परतले. यानंतर १९५२ ते १९६२ या दहा वर्षांच्या कालावधीत त्यांनी देशाचे उपराष्ट्रपतीपद भूषविले. १४ मे १९६२ रोजी ते भारताचे राष्ट्रपती झाले. भारत सरकारकडून त्यांना 'भारतरत्न' या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राधाकृष्णन यांना नोबेल साहित्य पुरस्कारासाठी १६ वेळा, तर नोबेल शांतता पुरस्कारासाठी ११ वेळा नामांकन मिळाले होते.
शिक्षणाचे महत्त्व :
शिक्षणक्षेत्रात योगदान दिलेल्या शिक्षकांच्या आदरार्थ जगभरात हा दिवस साजरा करण्यात येतो. व्यक्ती आणि समाजाच्या विकासात शिक्षणाचा वाटा मोलाचा आहे. जिथे शिक्षण आहे तिथेच विकास आहे, म्हणूनच शिक्षणातून व्यक्तीची जडणघडण करणाऱ्या शिक्षकाचा आदर करण्याचा हा दिवस असतो. विद्येविना मती गेली । मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली । गतीविना वित्त गेले । वित्ताविना शूद्र खचले । इतके अनर्थ एका अविद्येने केले ।।, असे महात्मा ज्योतिबा फुले यांनी म्हटलेच आहे. यावरून शिक्षणाची महती अधोरेखित होते.
जागतिक शिक्षक दिन :
युनेस्कोने ५ ऑक्टोबर हा दिवस आंतराराष्ट्रीय शिक्षक दिन म्हणून जाहीर केला आहे. रशियामध्ये १९६५ ते १९९४ पर्यंत ऑक्टोबर महिन्यातील पहिला रविवार शिक्षक दिन म्हणून साजरा केला जात होता. १९९४ सालापासून युनेस्कोच्या निर्णयानंतर त्यांनी ५ ऑक्टोबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून स्विकारला. इंडोनेशिया, व्हिएतनाम देशात नोव्हेंबर महिन्यात, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, ब्राझील, कॅनडा, चीली, जर्मनी यासारख्या देशात ऑक्टोबरमध्ये शिक्षक दिन साजरा करण्यात येतो.
(Teachers Day)
Post a Comment