Header Ads

Loknyay Marathi

कॉलेजांचे ऑनलाइन वर्ग ऑगस्टमध्ये भरणार? UGC चे वेळापत्रक लवकरच...

कॉलेजांचे ऑनलाइन वर्ग ऑगस्टमध्ये भरणार? UGC चे वेळापत्रक लवकरच


शाळांचे वर्ग ऑनलाइन भरलेत. मात्र कॉलेजांचे वर्ग नेमके कधी भरणार याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र ऑगस्ट महिन्यात कॉलेजांचे वर्ग भरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याबाबत कॉलेजांची काय तयारी आहे याचा आढावा घेण्यासाठी सोमवारी मुंबई विभागीय सहसंचालकांनी बैठक घेतल्याचे सूत्रांकडून समजते.

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या २९ एप्रिलच्या सूचनेनुसार १ ऑगस्टपासून द्वितीय वर्ष आणि तृतीय वर्षाचे कॉलेज सुरू करावे असे स्पष्ट करण्यात आले होते. मात्र ६ जुलै रोजी आयोगाने दिलेल्या सुधारीत सूचनांनुसार आयोग लवकरच सुधारीत शैक्षणिक वेळापत्रक देणार आहे. मात्र कॉलेजांनी ऑगस्टमध्ये वर्ग भरवण्याची तयारी सुरू केली आहे. तर काही कॉलेजांनी प्रायोगिक तत्त्वावर ऑनलाइन वर्गही सुरू केले आहेत. याला विद्यार्थ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून शिक्षकही ऑनलाइन शिक्षण देण्यासाठी प्रशिक्षित झाले आहेत. मात्र ऑनलाइन शिक्षणासाठी कॉलेज किती समर्थ आहेत याचा आढावा घेण्यासाठी सोमवारी सह संचालकांनी प्राचार्यांच्या एका बैठकीचे आयोजन केले होते. यात सर्व प्राचार्यांकडून ऑनलाइल शिक्षणाच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. यावेळी सर्व प्राचार्य ऑनलाइन शिक्षणासाठी तयारीत असल्याचे सांगण्यात आले. यात काही प्राचार्यांनी इंटरनेट जोडणीबाबत समस्या मांडली. मात्र त्यावरही तोडगा काढण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून समजते.

प्राध्यापकांना प्रशिक्षण

कॉलेजांना ३० जुलैपर्यंत सुटी जाहीर करण्यात आली असली तरी १ जुलैपासून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी कॉलेजे सुरू झाली आहेत. या कालावधीत प्राध्यापकांना ऑनलाइन शिक्षणाचे प्रशिक्षण दिले गेले आहे. यामुळे सर्व प्राध्यापकांना तंत्रस्नेही करण्यात आले आहे.काही कॉलेजांनी स्वत:ची ऑनलाइन शिक्षणाची तयारी यंत्रणा तयार केली आहे, तर काही कॉलेजांनी प्रयोगिक वर्गही भरवण्यास सुरुवात केली आहे. या वर्गांना खूप चांगला प्रतिसाद मिळत असून प्राध्यापक प्रशिक्षित झाल्याने त्यांनाही ऑनलाइन वर्गात उत्साह वाटत असल्याचे मत काही प्राचार्यांनी या बैठकीत नोंदविले आहे.

किती अभ्यासक्रम शिकवायचा?

सद्यस्थिती पाहता कॉलेजे ऑनलाइनच सुरू होण्याची शक्यता जास्त आहे. यामुळे ऑफलाइन कॉलेज सुरू होईपर्यंत किती अभ्यासक्रम शिकवावा याबाबतही या बैठकीत चर्चा झाली. यात नवीन शैक्षणिक वर्षातील प्रथम सत्रातील ३० टक्के अभ्यासक्रम ऑनलाइन माध्यमातून शिकवावा, असे मत काही प्राचार्यांनी नोंदविले. तर ऑफलाइन वर्ग सुरू झाल्यावर या अभ्यासक्रमाची उजळणीही करावी, असे मत या बैठकीत नोंदविण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगितले.

पुढील आठवड्यात वेळापत्रकाची अपेक्षा

विद्यापीठ अनुदान आयोगाने सुधारीत निकष जाहीर केल्यावर येत्या विद्वत परिषदेच्या बैठकीत मुंबई विद्यापीठाचे शैक्षणिक वेळापत्रक तयार होऊन त्याला मान्यता मिळण्याची शक्यता आहे. यामुळे पुढील आठवड्यात मुंबई विद्यापीठाचे शैक्षणिक वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.